(मंडणगड / रत्नागिरी)
गेल्या दोन दिवसांपासून घराबाहेर न पडलेल्या ५० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंडणगड येथील बोरीचा माळ परिसरातील कोंडेकर चाळ येथे उघडकीस आली. दिनेश मोहन मेहता असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते घरात बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश मेहता हे मिळेल तेथे मजुरीचे काम करीत होते. ते दारूच्या व्यसनाधीन असल्याचेही पोलिसांत दिलेल्या माहितीत नमूद आहे. ते मंडणगड येथील बोरीचा माळ परिसरातील कोंडेकर चाळीत एकटेच राहत होते. १५ नोव्हेंबरपासून ते १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.४५ वाजेपर्यंत घराबाहेर न पडल्याने खबर देणारे मिलन मरलीधर मेहता आणि गावातील काही नागरिकांनी त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली. त्यावेळी दिनेश मेहता हे घरात बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २१/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, या प्रकरणी पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.


