(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी-पावस बायपास मार्गावरील हॉटेल आराध्यसमोरील वळणावर टाटा ट्रक आणि मारुती सुझुकी एस-क्रॉस या चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाली. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या प्रकरणी ट्रकचालकाविरोधात पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपेंद्र विठ्ठल पाटील (वय ५७, रा. गावखडी, सुरकरवाडी, ता. जि. रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी एस-क्रॉस (एमएच ०८ एएन ४५०९) घेऊन रत्नागिरीहून पावसच्या दिशेने जात होते. हॉटेल आराध्यसमोरील वळणावर आले असता सापुचेतळे येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या टाटा ट्रक (एनएल ०१ एएफ ७२०८) ने समोरून येऊन त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.
या अपघातप्रकरणी उपेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक अंकीत ओंकार नाथ (वय २७, रा. ईकलेरा माताजी, जि. देवास, मध्य प्रदेश) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


