(दापोली /रत्नागिरी)
दापोली तालुक्यातील दापोली नवानगर परिसरात ७९ वर्षीय वृद्धाने राहत्या घराच्या अंगणातील विहिरीलगत असलेल्या पंपाच्या शेडमध्ये गळफास घेतल्याची घटना घडली. ही घटना २ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास निदर्शनास आली. मानसिंग गणपतराव राजेशिर्के (वय ७९, रा. दापोली नवानगर, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेशिर्के यांनी राहत्या घराच्या अंगणाच्या पुढील बाजूस विहिरीलगत असलेल्या पंपाच्या शेडमध्ये नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला होता. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास खबर देणारे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तत्काळ राजेशिर्के यांच्या गळ्याभोवतीचा दोर काढून त्यांना घरात आणले.
यानंतर रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध न झाल्याने डॉक्टर सूरज राठोड यांना घरी बोलावून त्यांची तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेची व्यवस्था करून राजेशिर्के यांना उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता राजेशिर्के यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेची नोंद दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७३/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.


