(दापोली/ रत्नागिरी)
दापोली शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या काझी रहमान काझी इसा वक्फ संस्थेच्या सुमारे ६२१ गुंठे जमिनीच्या व्यवहारावरून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एका सत्ताधारी राजकीय नेत्यासह संबंधित ट्रस्टचे माजी विश्वस्त, विकासक आणि जमीन खरेदीदार अशा एकूण ४४ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दापोली अर्बन सायन्स कॉलेज परिसरातील ही जमीन मूळ मालक काझी रहमान काझी इसा यांनी १४ सप्टेंबर १८९७ रोजी मृत्युपत्राद्वारे मुस्लिम समाजाच्या धार्मिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय उपयोगासाठी वक्फ केली होती. त्यानंतर १९५५-५६ मध्ये संबंधित संस्थेची सार्वजनिक ट्रस्ट म्हणून नोंदणी करण्यात आली. या जमिनीच्या पुढील व्यवहारांबाबत आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर वक्फ मंडळाने प्रकरणाची दखल घेतली आहे. वक्फ मंडळाच्या नोंदीनुसार, संबंधित जमिनीच्या हस्तांतरणासह तिच्यावर करण्यात आलेल्या प्लॉटिंग आणि विक्री व्यवहाराबाबत गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. मंडळाच्या परवानगीशिवाय वक्फ मालमत्तेचा व्यवहार करण्यात आला का, तसेच या प्रक्रियेत संबंधित कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन झाले का, याचा खुलासा नोटीस बजावलेल्या व्यक्तींकडून मागविण्यात आला आहे.
या प्रकरणात मे. बाळ लँड डेव्हलपर्स या विकासकाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित जमिनीवर प्लॉटिंग करून विविध व्यक्तींना भूखंड विक्री करण्यात आल्याचा आरोप असून, या व्यवहारांशी संबंधित व्यक्तींनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वक्फ मंडळाने संबंधितांना सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर जमीन वक्फच्या ताब्यात का घेण्यात येऊ नये आणि संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबतही स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि जमिनीच्या व्यवहाराची कायदेशीरता याबाबत अंतिम निष्कर्ष वक्फ मंडळाच्या पुढील कार्यवाहीतून स्पष्ट होणार आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे दापोलीतील मौल्यवान वक्फ मालमत्तांच्या व्यवहाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित जमिनीच्या नोंदी, हस्तांतरण प्रक्रिया, प्लॉटिंग परवानग्या आणि झालेल्या विक्री व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.


