(दापोली)
तालुक्यातील करंजाणी येथे बसथांब्यावर उभ्या असलेल्या एका युवकाला पैशांच्या देवघेवीच्या वादातून जबरदस्तीने मोटारीत बसवून अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत गौराबाई बसवराज पवार (वय ५०, रा. करंजाणी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा किरण बसवराज पवार (वय ३०) याचे संशयितांनी अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास किरण पवार करंजाणी बसथांब्यावर उभा असताना संशयित शब्बीर मांडलेकर (वय ६०) याच्यासह जिशान शब्बीर मांडलेकर (वय २८), सुबान शब्बीर मांडलेकर (वय २१) आणि सरजीन लियाकत मांडलेकर (वय १८, सर्व रा. म्हाप्रळ, ता. मंडणगड) तसेच अन्य तिघेजण तेथे आले. त्यांनी पैशांच्या कारणावरून वाद घालत ‘तू पैसे दिले नाहीस तर तुला ठार मारू’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर संशयितांनी किरण पवार याला जबरदस्तीने मोटारीत बसवून पैशांची मागणी करत त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पवार कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी दापोली पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

