(दापोली)
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांनाही चोरट्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे एक धक्कादायक प्रकरण दापोलीत उघडकीस आले आहे. दापोली एसटी आगाराच्या आवारात असलेल्या श्री दत्तगुरू मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने केवळ ५०० ते ७०० रुपयांची रक्कम लंपास केली. हा प्रकार शनिवार, १८ ऑक्टोबरच्या रात्री आठ वाजल्यापासून रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या कालावधीत घडला.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासांतच आरोपीला पुणे जिल्ह्यातून अटक केली, ही विशेष बाब ठरली आहे. या प्रकरणी राजेंद्र एकनाथ कुबाळे (वय ५७, रा. बस अधिकारी क्वार्टर्स, दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास दत्तगुरू मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडली आणि त्यातील रक्कम चोरून नेली. चोरी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला.
तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फूटेज आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी काही तासांतच आरोपीचा माग काढला. रात्री १० वाजून २० मिनिटांनी पोलिसांनी ओम बाळकृष्ण सातपुते (वय ३९, रा. तळेगाव ढमढरे, ता. शिरुर, जि. पुणे) या आरोपीला अटक केली. प्राथमिक चौकशीत सातपुते यानेच मंदिरातील दानपेटी फोडल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक १९१/२०२५ नोंदवून भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा २०२३ च्या कलम ३०५(अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
चोरी गेलेली रक्कम किरकोळ असली तरी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मंदिरावर हात साफ करण्याच्या या कृत्यामुळे दापोली परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, दापोली पोलिसांचा चापल्यपूर्ण तपास स्थानिकांमध्ये कौतुकास्पद ठरला आहे. पुढील तपास दापोली पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

