(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील उक्षी येथे रेल्वे मार्ग ओलांडताना रेल्वेची धडक बसल्याने झारखंड राज्यातील ३३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी ही घटना घडली. अपघातानंतर रेल्वे मार्गाजवळ गंभीर अवस्थेत पडलेल्या तरुणाला रेल्वेच्या मोटरमनने दाखवलेली सतर्कता, तसेच संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील पोलिस आणि होमगार्ड जवानांच्या तत्परतेमुळे तातडीने रुग्णालयात दाखल करता आले.
सुरंजन सानिका डुंगडुंग (वय ३३) असे जखमी तरुणाचे नाव असून, तो झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो के. प्रसाद यांच्या कंपनीत काम करत असल्याचे समजते. १० ऑक्टोबर रोजी तो निवळी येथील आठवडा बाजारात गेला होता. बाजारातील काम आटोपून परतत असताना उक्षी येथे रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या वेळी त्याला रेल्वेची धडक बसली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आणि रेल्वे मार्गाजवळ पडून होता.
दरम्यान, रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसच्या मोटरमनच्या नजरेस जखमी तरुण पडला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोटरमनने तातडीने संगमेश्वर रेल्वे स्थानकावर याबाबत माहिती दिली. त्यानंतर जखमी तरुणाला मदत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. सुरंजनला रेल्वेच्या डब्यातून संगमेश्वर रेल्वे स्थानकावर आणण्यात आले.
मंगला एक्स्प्रेस स्थानकात पोहोचताच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस आणि होमगार्ड जवानांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिस कॉन्स्टेबल मोरे, होमगार्ड जवान मुजीब डोंगरकर, सागर कांगणे, वाने आणि महिला होमगार्ड मांगले यांनी जखमी तरुणाला मदत केली. छावा सामाजिक संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वहाळ दळवी यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला.
रेल्वे स्थानकावरील या तत्परतेमुळे जखमी तरुणाला वेळेत वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. स्थानिकांच्या सहकार्याने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्याच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील उपचारांसाठी त्याला रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
रेल्वे मार्गाजवळ गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाला वेळेत मदत मिळाल्याने त्याच्यावर उपचार सुरू करता आले. अपघाताची माहिती तातडीने देणाऱ्या मोटरमनची सतर्कता, संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील पोलिस व होमगार्ड जवानांची तत्परता आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे त्याला रुग्णालयात पोहोचवण्याची प्रक्रिया वेगाने पार पडली.


