(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
जोशी पाळंद येथील जोशी पाळंद आर्केड या इमारतीच्या टेरेसवर फिरण्यासाठी गेलेल्या २९ वर्षीय तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २४ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. साईश दिलीप बाईंग (वय २९, रा. जोशी पाळंद आर्केड, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साईश याच्यावर गेल्या सात ते आठ वर्षांपासून मानसिक आजारासंदर्भात रत्नागिरीतील डॉ. शेरे यांच्याकडे उपचार सुरू होते. त्याला राहत्या इमारतीच्या टेरेसवर फिरण्याची नेहमीची सवय होती. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे टेरेसवर फिरण्यासाठी गेला होता.
रात्री साडेआठच्या सुमारास इमारतीखाली काही नागरिक जमले असल्याचे आणि एक तरुण इमारतीवरून पडल्याची चर्चा सुरू असल्याचे दिलीप गजानन बाईंग यांना समजले. ही माहिती मिळताच त्यांनी खाली जाऊन पाहणी केली असता, जखमी अवस्थेत पडलेला तरुण आपलाच मुलगा साईश असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तातडीने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच रात्री ८.४० वाजता त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये करण्यात आली असून, पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.


