( नाटे / वार्ताहर )
तालुक्यातील नाणार येथील इंगळवाडी परिसरात खाडीमध्ये शिंपले पकडण्यासाठी गेलेल्या भाटकर कुटुंबातील चार मुले बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत चौघांचाही बुडून मृत्यू झाला असून, या घटनेमुळे नाणार परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाणार इंगळवाडी येथील खाडीमध्ये शिंपले गोळा करण्यासाठी हे चौघे पाण्यात उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील चार जण या दुर्घटनेत सापडल्याने परिसरात चिंतेचे आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपडेट
भाटकर कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू; १५ वर्षीय माहिराचा शोध सुरू
राजापूर तालुक्यातील नाणार येथील इंगळवाडी परिसरात खाडीमध्ये बुडालेल्या भाटकर कुटुंबातील चार मुलांपैकी तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. मोहम्मद जुनेद भाटकर (वय ६ वर्षे), जुहेरिया जुनेद भाटकर (वय ९ वर्षे) आणि बुशिरा जुनेद भाटकर (वय ११ वर्षे) अशी मृत मुलांची नावे आहेत. तर माहिरा जुनेद भाटकर (वय १५ वर्षे) हिचा शोध अद्याप सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंगळवाडी येथील जुनेद भाटकर यांच्या पत्नी हिना भाटकर या रविवार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे ३:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलांसह नाणार परिसरातील खाडीत मुळे व कालवे काढण्यासाठी गेल्या होत्या. आई-वडील खाडीपात्रात कालवे काढत असताना, दुपारी सुमारे ४:३० वाजण्याच्या सुमारास मुलांना खाडीतील खोल खड्ड्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे एकापाठोपाठ एक अशी पाचही मुले खोल पाण्यात ओढली गेली.
मुलांचा आरडाओरडा ऐकून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांत एका लहान मुलीला वाचवण्यात यश आले; मात्र इतर चार भावंडे खाडीच्या खोल पाण्यात बुडाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, बेपत्ता मुलीचा शोध सुरू आहे.
या दुर्घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांकडून शोधमोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. चौथ्या मुलीचा शोध घेण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असून, या घटनेमुळे नाणार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


