(देवरूख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील युवक-युवती आणि खेळाडूंना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत देवरूख येथे बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत शेट्ये आणि संगमेश्वर तालुका सरचिटणीस संदीप वेलवणकर यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले.
देवरूख हे संगमेश्वर तालुक्याचे प्रमुख ठिकाण असून तालुक्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक-युवती आणि खेळाडू शिक्षण, क्रीडा सराव तसेच विविध स्पर्धांसाठी येथे येतात. मात्र, परिसरात राष्ट्रीय दर्जाच्या आणि सर्वसमावेशक क्रीडा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंना सरावासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर देवरूख येथे आधुनिक आणि सर्व सुविधांनी युक्त बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कोणत्या क्रीडा सुविधा उभारण्याची मागणी?
प्रस्तावित क्रीडा संकुलात क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, ४०० मीटर धावपट्टी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल मैदान, तसेच बॅडमिंटनसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय मल्टिपर्पज इनडोअर स्पोर्ट्स हॉल, कुस्ती, ज्युदो आणि बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र, आधुनिक व्यायामशाळा, प्रेक्षक गॅलरी आणि आवश्यक पूरक सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे.
या क्रीडा संकुलामुळे संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थी आणि खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण व सरावाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील गुणवान खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळण्यास मदत होईल. तसेच युवकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, शिस्त आणि क्रीडा संस्कृती रुजण्यासह व्यसनमुक्तीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नारायण राणेंकडून सकारात्मक प्रतिसाद
या मागणीला खासदार नारायण राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित पातळीवर आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे देवरूखच्या क्रीडा विकासाच्या दृष्टीने या मागणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, नंदू चव्हाण, संगमेश्वर उत्तर मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के, तालुका सरचिटणीस संदीप वेलवणकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

