(लांजा/ रत्नागिरी प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी परिसरात वारंवार घडणाऱ्या जीवघेण्या अपघातांच्या मालिकेविरोधात आणि महामार्ग प्रशासनाच्या अक्षम्य उदासीनतेविरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी संतप्त शिवसैनिकांनी अंजणारी येथे तब्बल अर्धा तास महामार्ग रोखून धरत ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली होती.
लांजा तालुक्यातील मठ ते अंजणारी या तीव्र उताराच्या धोकादायक पट्ट्यासह वेरळ, वाकेड आणि लांजा शहर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. या अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, कित्येक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. यापूर्वी महामार्ग विभागाने मठ ते अंजणारी दरम्यान उभारलेले गतिरोधक अत्यंत सदोष असल्याचा आरोप करत शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतरही तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेले गतिरोधक अपघात रोखण्यास कुचकामी ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत आंदोलकांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा तीव्र निषेध केला.
आंदोलनादरम्यान उपस्थित महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी घेराव घालून जाब विचारत धारेवर धरले. “रस्ते विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ आता खपवून घेतला जाणार नाही. केवळ पोकळ आश्वासनांची खैरात न करता, तांत्रिकदृष्ट्या ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवून लोकांचे जीव वाचवा,” अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रशासनाविरोधात हे आंदोलन शांततेत करण्यात आले असले, तरी लवकरात लवकर ठोस कार्यवाही न झाल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाप्रमुख दत्ता कदम आणि उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी लांजा तालुकाप्रमुख अभिजित राजे शिर्के, विधानसभा क्षेत्रप्रमुख तात्या सरवणकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेश राणे, संगमेश्वर तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, युवा तालुकाप्रमुख अभिजीत युवराज हांदे, माजी उपसभापती अजित गावणकर, अमोल मेस्त्री, दादा शिवगण, पूर्वा मुळे, विश्वास मांडवकर, मोहन तोडकरी, शांताराम गुरव आदींसह लांजा, राजापूर, साखरपा आणि संगमेश्वर येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनातील संभाव्य तणाव लक्षात घेऊन घटनास्थळी सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मनाई आदेशाचे उल्लंघन; सात पदाधिकाऱ्यांसह १२० जणांवर गुन्हा
अंजणारी बसस्थानक येथे २५ नोव्हेंबर रोजी मुंबई-गोवा महामार्गावर मनाई आदेश धुडकावून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम यांच्यासह सात प्रमुख पदाधिकारी आणि १०० ते १२० कार्यकर्त्यांविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाचा मनाई आदेश आणि पोलिसांची नोटीस बजावूनही महामार्गाच्या दोन्ही बाजूंना ठिय्या देत वाहतूक रोखल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २२३ (अ) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.


