(देवरुख)
संगमेश्वर तालुक्यातील मारळ–बामणोली रस्त्यावर शनिवारी सायंकाळी भरधाव सिमेंट मिक्सरच्या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. काजू बागेत काम करून घरी परतणाऱ्या या महिलेला निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकाने जोरदार धडक दिल्याची घटना बामणोली कातळस्टॉपजवळ घडली. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात उत्तर प्रदेशातील एका चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बामणोली मधलीवाडी येथील रहिवासी दीपक पांडुरंग गराटे (वय 44) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास मृत महिला काजू बागेची साफसफाई करून मारळ–बामणोली रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी घरी जात होत्या. बामणोली कातळस्टॉपपासून सुमारे 600 मीटर अंतरावर एका मोरीचे बांधकाम सुरू असून, त्या ठिकाणी खडी व वाळू मिक्स करण्याचे काम सुरू होते.
यावेळी एक्सिस सिमेंट मिक्सर (क्रमांक MH 09 GZ 2014) चालक मोनू आत्मज मांगी (वय 23, रा. ललितपूर, उत्तर प्रदेश) हा वाहन अतिवेगात आणि निष्काळजीपणे पाठीमागे घेत होता. नियंत्रण सुटल्याने मिक्सरने पादचारी महिलेला जोरदार धडक दिली. धडकेनंतर मिक्सरचे चाक महिलेच्या डाव्या पायावरून गेल्याने त्या रस्त्यावर कोसळल्या.
या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि डाव्या कानाच्या वरच्या भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय देवरुख येथे दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी देवरुख पोलिसांनी आरोपी चालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचा पुढील तपास देवरुख पोलीस करीत आहेत.

