(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामविकासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर मानाचा बहुमान मिळवला आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२६-२७’ अंतर्गत खामशेत ग्रामपंचायतीने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खामशेत ग्रामपंचायतीच्या या यशामुळे गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. नाशिक येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, खामशेतचे लोकनियुक्त सरपंच मंगेश सोलकर, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गुहागरचे गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, खामशेतचे प्रशासक चंद्रकांत कारंडे, ग्रामसेवक श्री. मोहिरे, साईनाथ बागुल आणि कृष्णदेव कदम उपस्थित होते.
स्वच्छता, शाश्वत पाणीपुरवठा, मूलभूत सुविधांचा विकास, पारदर्शक प्रशासन आणि विविध शासकीय कल्याणकारी योजनांची तळागाळातील घटकांपर्यंत प्रभावी अंमलबजावणी या निकषांवर खामशेत ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केली. लोकसहभाग आणि प्रशासकीय नियोजनाच्या माध्यमातून गावाने ग्रामविकासाचा आदर्श निर्माण केला. या कामगिरीची दखल घेत ग्रामपंचायतीला राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
या सोहळ्यास साखरी त्रिशूलचे सरपंच सचिन मस्कर, झोपावेचे सरपंच आशीर्वाद पावसकर, खोडदेचे सरपंच प्रतीक पवार तसेच पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचे अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खामशेत ग्रामपंचायतीने मिळवलेल्या या राज्यस्तरीय यशाबद्दल सरपंच मंगेश सोलकर, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि गुहागर पंचायत समितीच्या यंत्रणेचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.
राज्यस्तरीय ग्रामपंचायत गट पुरस्कार
तृतीय क्रमांक विभागून
ग्रामपंचायत उटी बु. , ता. औसा, जि. लातूर व ग्रामपंचायत कोतवालबर्डी, ता. काटोल, जि नागपूर
द्वितीय क्रमांक विभागून
ग्रामपंचायत खामशेत, गुहागर, जि. रत्नागिरी व ग्रामपंचायत लाडूद, ता. बागलाण, जि. नाशिक
प्रथम क्रमांक ग्रामपंचायत
आडाचीवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे


