(देवळे / प्रकाश चाळके)
काजू बियांचे कमी-जास्त दर, काजूगरांना बाजारपेठेत अपेक्षित भाव न मिळणे आणि गेल्या चार-पाच वर्षांपासून बाजारभावातील सातत्यपूर्ण चढउतार यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील काजू प्रक्रिया उद्योग आर्थिक अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीचा फटका अनेक काजू कारखानदारांना बसला असून, जिल्ह्यातील अनेक कारखाने सध्या बंद अवस्थेत आहेत. संकटात सापडलेल्या या उद्योगाला पुन्हा उभारी देण्यासाठी आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. काजू प्रक्रिया उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित शासकीय अधिकारी आणि रत्नागिरी जिल्हा काजू प्रक्रिया धारक संघाची संयुक्त बैठक येत्या काही दिवसांत घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
कोकणातील शेतकऱ्यांचे काजू हे प्रमुख पीक आहे. मात्र, गेल्या वर्षी काजू बियांचे दर अधिक असताना बाजारपेठेत काजूगरांना त्या तुलनेत समाधानकारक भाव मिळाला नाही. परिणामी, काजू प्रक्रिया करणाऱ्या कारखानदारांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. त्यातच गेल्या चार-पाच वर्षांपासून काजूच्या बाजारभावात होत असलेल्या चढउतारांमुळे या उद्योगाच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. अनेक कारखाने बंद पडल्याने काजू प्रक्रिया उद्योगाला पुन्हा चालना देण्याची गरज निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी काजू संघाचे अध्यक्ष विवेक बारगीर आणि संचालक मंडळाच्या सदस्यांनी आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन काजू उद्योजकांसमोरील विविध समस्या मांडल्या. यावेळी जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या काजूची साठवणूक जिल्ह्यातच करण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून सर्व कारखानदारांना वर्षातील किमान दहा महिने कारखाने सुरू ठेवणे शक्य होईल, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
त्याचबरोबर तालुकास्तरावर गोदामे आणि सीएफसी (CFC) सुविधा उपलब्ध करून देणे, काजूगरांचे ब्रँडिंग करून त्यांच्या विक्रीसाठी व्यवस्था निर्माण करणे तसेच माल तारण कर्ज योजना राबविणे आदी महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.
या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कृषी विभाग, महाराष्ट्र पणन महामंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र काजू बोर्ड यांच्यासह काजू उद्योगाशी संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांची रत्नागिरी येथे काजू प्रक्रिया धारक संघासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या माध्यमातून काजू प्रक्रिया उद्योजकांच्या अडचणी संबंधित यंत्रणांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
काजू प्रक्रिया धारक संघ आणि आमदार किरण सामंत यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी प्रकाश चाळके आणि प्रताप पवार यांनी पुढाकार घेतला. उद्योजकांनी मांडलेल्या समस्या जाणून घेतल्यानंतर आमदार सामंत यांनी येत्या काही दिवसांत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह काजू प्रक्रिया धारक संघाची संयुक्त बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी काजू संघाचे अध्यक्ष विवेक बारगीर, कार्याध्यक्ष ओमकार कोलते, सचिव दिनेश पवार, संचालक सचिन जाधव, प्रकाश चाळके, तौफिक खतिब, जयेश माजळकर, मोहसीन खतिब आणि शासकीय संपर्क प्रमुख प्रताप पवार उपस्थित होते.


