(पणजी / वृत्तसंस्था)
जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पावन प्रेरणेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने ओल्ड गोवा येथील गोवेश्वर महाशिव मंदिरातून शनिवारी (१० ऑक्टोबर) ‘वसुंधरा पायी दिंडी’ श्रीक्षेत्र नाणीजधामच्या दिशेने रवाना झाली आहे. या पदयात्रेत ५०० हून अधिक धामयात्री सहभागी झाले असून, पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
दिंडीतील धामयात्रींनी पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे फलक, ध्वज आणि घोषवाक्ये असलेले पोशाख परिधान केले आहेत. दिंडीच्या प्रस्थान सोहळ्याला गोवा राज्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक, आमदार राजेश फळदेसाई यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी पदयात्रेत सहभागी झालेल्या धामयात्रींना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. दक्षिण गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, पंचायत सदस्य सिद्धेश नाईक आणि ओल्ड गोव्याच्या सरपंच सौ. मेधा मेघश्याम पर्वतकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षलागवड आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
ओल्ड गोवा उपपीठातून निघालेली ही दिंडी सुमारे ११ दिवसांचा पायी प्रवास करून २१ ऑक्टोबर रोजी जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे पोहोचणार आहे. या प्रवासादरम्यान विविध गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असून, पर्यावरण संवर्धन, वृक्षांचे महत्त्व आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामांविषयी नागरिकांमध्ये जागृती केली जाणार आहे.
नागपूर, तेलंगणा, मराठवाडा, नाशिक, मुंबई, पुणे आणि गोवा या सात उपपीठांतून ‘वसुंधरा पायी दिंडी’ नाणीजधामच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. कडक उन्हाची पर्वा न करता धामयात्री पायी प्रवास करत पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत. धार्मिक श्रद्धेसोबतच निसर्गसंवर्धनाची जाणीव समाजात निर्माण करण्याचा या उपक्रमातून प्रयत्न केला जात आहे.
छायाचित्र:
1.ओल्ड गोवा येथून ५०० हून अधिक धामयात्री ‘वसुंधरा पायी दिंडी’तून श्रीक्षेत्र नाणीजधामच्या दिशेने रवाना झाले.
2.‘वसुंधरा पायी दिंडी’च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दक्षिण गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, पंचायत सदस्य सिद्धेश श्रीपाद नाईक आणि सरपंच सौ. मेधा पर्वतकर उपस्थित होते.


