(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्या ३६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोशन गुलामसाब अमीनगड (रा. सहजीवन सोसायटी, उत्कर्षनगर, कुवारबाव, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रोशन अमीनगड या गेल्या तीन वर्षांपासून मधुमेह आणि थायरॉईडच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर कुवारबाव येथील स्थानिक डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. २४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घरी असताना त्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्रकृती अस्वस्थ झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना रात्री १०.४० वाजता रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच रात्री ११.३५ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. नूतन सनगरे यांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १५४/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे.


