(रत्नागिरी)
करबुडे येथून रत्नागिरीकडे येणाऱ्या दुचाकीचा मजगाव रोड परिसरात झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. ३०) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
या अपघातात यल्लप्पा दऱ्याप्पा जगदाने (वय ३१, रा. नराळे, पो. पारे, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक रविराज विनोबा राजके (वय २८, रा. सातारा) हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविराज राजके हे यल्लप्पा जगदाने यांना दुचाकीवरून करबुडेहून रत्नागिरीकडे घेऊन येत होते. मजगाव रोड येथे दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात यल्लप्पा गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी परकार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. शहर पोलिस अधिक तपास करत असून जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत घटनेची नोंद करण्यात आली आहे. शहर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंदणीची प्रक्रिया सुरू होती.

