( रत्नागिरी )
भारतीय जनसंघाचे संस्थापक नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड भारताच्या संकल्पनेसाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे. सशक्त, समृद्ध आणि विकसित भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात ‘पंचपरिवर्तन’ स्वीकारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांनी केले.
भारतीय जनता पक्ष, रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती पंधरवड्यानिमित्त देवरूख येथे आयोजित व्याख्यानमालेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी सचिन वहाळकर यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. विकसित आणि आत्मनिर्भर भारताची उभारणी केवळ शासनाच्या योजनांमुळे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाच्या सकारात्मक आचार-विचार आणि सामाजिक जबाबदारीतून शक्य होईल, असे ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने राबविलेले ‘पंचपरिवर्तन’ अभियान हे केवळ संघटनात्मक उपक्रम नसून विकसित भारताच्या दिशेने प्रत्येक नागरिकाने स्वीकारावयाची जीवनशैली असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन आणि ‘स्व’बोध या पंचसूत्रांचा अंगीकार केल्यास डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न अधिक प्रभावीपणे साकार होईल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा संयोजक सुशांत मुळ्ये यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. भाजप संगमेश्वर दक्षिण मंडल अध्यक्ष रूपेश कदम यांनी प्रमुख वक्ते सचिन वहाळकर यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा चिटणीस प्रकाश लेले, जिल्हा उपाध्यक्ष अभिजित शेट्ये, देवरूखच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, अनुसूचित जाती मोर्चाचे मंडल अध्यक्ष जाधव, गटनेत्या स्वाती राजवाडे, नगरसेविका कविता नार्वेकर, श्रद्धा इंदुलकर, समृद्धी वेलवणकर, नगरसेवक रूपेश भागवत, क्रीडा सेलचे जिल्हा संयोजक दत्ता नार्वेकर, तालुका क्रीडा संयोजक संदीप वेलवणकर, ज्येष्ठ नेते मुकुंद जोशी, जिल्हा सदस्य सदानंद राजवाडे, तुकाराम किरवे, रेश्मा किरवे, शंकर मालप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा संयोजक सुशांत मुळ्ये यांनी केले.

