(खेड/ रत्नागिरी प्रतिनिधी)
मुंबई–गोवा महामार्गावरील भोस्ते घाट परिसरात रविवारी रात्री झालेल्या साखळी अपघातात शासकीय वाहनासह तीन वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी एका चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र संशयित आरोपी चालक किरकोळ जखमी झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ मे रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस हे शासकीय वाहनातून मुंबई–गोवा महामार्गाने चिपळूणहून खेडच्या दिशेने प्रवास करत होते. त्यावेळी भोस्ते घाट उतरत असताना पुढे असलेल्या वाहनांना अचानक धडक बसून साखळी अपघात घडला. वाहन क्रमांक MH-43 BP-8097 वरील चालक प्रविण लक्ष्मण मालप (वय ३९, रा. रायपाटण, ता. राजापूर) याने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत समोरील इर्टिगा कारला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर इर्टिगा कार पुढे जाऊन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या ताफ्यातील शासकीय वाहन क्रमांक MH-08 BE-3391 ला मागून आदळली. त्यामुळे तिन्ही वाहनांचे नुकसान झाले.
या अपघातात संशयित आरोपी चालक प्रविण मालप किरकोळ जखमी झाला असून, घटनेनंतर त्याच्याविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी लतिकेश सखाराम मोरे यांनी फिर्याद दिली असून, आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५ (अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

