(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील हिवताप (मलेरिया) नियंत्रणाशी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला तीव्र स्वरूप प्राप्त झाले असून, संपाच्या चौथ्या दिवशी तब्बल १०० टक्के कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. २१ एप्रिलपासून सुरू झालेल्या या संपामुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य यंत्रणा अक्षरशः ठप्प झाली आहे.
या संपाचा थेट परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर होत असून, गृहभेटी, जलजन्य व संसर्गजन्य आजारांचे प्रतिबंधात्मक सर्वेक्षण, तसेच हिवताप, डेंग्यू, कॉलरा, कावीळ, अतिसार यांसारख्या आजारांवरील नियंत्रणात्मक उपाययोजना मोठ्या प्रमाणावर ठप्प झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या उष्माघाताच्या घटनांवर देखील परिणामकारक उपाययोजना राबविणे कठीण झाले असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, शासनाच्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानालाही या संपाचा फटका बसला असून, नियोजित आरोग्य उपक्रमांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, आश्वासित प्रगती योजना (१०, २०, ३० वर्षे) वेळेत राबविणे, दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, तसेच रिक्त पदे तातडीने भरून कामाचा वाढता ताण कमी करणे, या मुद्द्यांचा समावेश आहे. याशिवाय पदनाम बदलाबाबतही कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी “आपल्या हक्कांसाठी हा लढा असून, शासनाने तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा,” अशी मागणी केली आहे. दरम्यान, या संपाची दखल लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाने घेणे अत्यावश्यक असल्याचे मतही व्यक्त होत आहे. आरोग्य सेवा ही अत्यावश्यक बाब मानली जात असताना, संगमेश्वरातील सद्यस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा तिढा लवकरात लवकर सोडविण्याची गरज अधोरेखित होत आहे.

