(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल गावातील पांडवकालीन विहीर आजही पूर्णपणे आटलेली नाही. नैसर्गिक झरे आणि पावसाचे पाणी अजूनही या विहिरीत साचते. मात्र महामार्गाच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कामामुळे ही विहीर गाळ, माती, दगड आणि कचऱ्याखाली दबली गेली आहे. परिणामी शुद्ध पाणी देणारी ही ऐतिहासिक विहीर आता दूषित पाण्याचा धोका ठरत आहे.
या विहिरीवर पाच ते सहा वाड्यांतील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे अवलंबन आहे. उन्हाळ्यात नळपाणी योजना असूनही अनेकदा थेंबभर पाणी मिळत नाही. अशा वेळी याच विहिरीचे पाणी ग्रामस्थांची तहान भागवत होते. मात्र सध्या परिस्थिती इतकी गंभीर आहे की, पाण्यासाठी लोकांना जंगलात विहीर शोधत फिरावे लागत आहे. विहिरीच्या परिसरात झाडी आणि काटेरी जंगल पसरल्याने ही ऐतिहासिक विहीर शोधणेही अवघड झाले आहे. विकासाच्या नावाखाली माणसाला पुन्हा जंगलात ढकलले जात असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
महामार्गाच्या कामात कोणतेही शास्त्रीय नियोजन न करता मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. या खोदकामातून निघालेली माती, दगड आणि धोंडे थेट विहिरीच्या दिशेने ढकलण्यात आले. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने हा सगळा गाळ विहिरीत जाऊन साचला. त्यामुळे झऱ्यांचे नैसर्गिक मार्ग अंशतः बंद झाले असून पाणी साचून राहते. स्वच्छतेअभावी हे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही. तरीही पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना तेच पाणी वापरण्याची वेळ येत आहे.
काम सुरू असताना ग्रामस्थांनी अनेकदा ठेकेदार आणि कामगारांना विहिरीला धोका पोहोचेल, याची जाणीव करून दिली गेली. विनवण्या, सूचना करूनही ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाने याकडे दुर्लक्ष केले. गेली दोन वर्षे केवळ “लवकरच गाळ काढू” किंवा “निधी मिळाल्यावर काम करू” अशी आश्वासने दिली जात आहेत. ग्रामस्थांचा सवाल आहे, लोकांच्या तहानेला निधीची वाट पाहावी लागते का? पाणी ही मूलभूत गरज असताना ठेकेदार आणि प्रशासन लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप होत आहे.
दूषित पाण्यामुळे आजार उद्भवले किंवा एखादी दुर्घटना घडली, तर जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पांढवकालीन विहीर ही केवळ पाण्याचा साठा नाही, तर पिढ्यान् पिढ्या ग्रामस्थांचे जीवन जगवणारी श्वासवाहिनी आहे. महामार्ग विकासाच्या नावाखाली या विहिरीचा घात करून प्रशासनाने ग्रामस्थांची तहान, आरोग्य आणि विश्वास या तिन्ही गोष्टींवर घाव घातला आहे. तात्काळ गाळ काढणे, विहिरीची स्वच्छता करणे आणि कायमस्वरूपी संरक्षण करणे ही केवळ मागणी नसून प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा ग्रामस्थांचा संताप उफाळून येण्याची शक्यता येथे निर्माण झाली आहे.

