(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तळेकांटे परिसरातील बाव नदी पुलाजवळ दोन बोलेरो पिकअप गाड्यांमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. ही घटना ११ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, विरुद्ध दिशेने वाहन चालवत अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका चालकाविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमेश्वर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशिष प्रदीप खरसे (वय २७, रा. गियें, ता. देवगड) हा बोलेरो पिकअप (एमएच ०७ एजे ४७५४) घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी त्याने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवले. त्याचदरम्यान समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअपला (एमएच ०८ एच ७९२९) त्याने जोरदार धडक दिली.
या अपघातात दुसऱ्या वाहनाचे चालक चंद्रशेखर तारासिंग जाधव (वय ४०) हे जखमी झाले असून त्यांच्यासोबत असलेले राज जाधव यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या प्रकरणी पोलीस हवालदार संदेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून संगमेश्वर पोलिसांनी आशिष खरसे यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

