(संगमेश्वर / वार्ताहर)
काही स्वप्ने एसी गाडीत बसून नव्हे, तर भर उन्हात अनवाणी पायपीट करून पूर्ण केली जातात. याचाच प्रत्यय फुणगूस येथील आरजू इरफान पटेल हिने आपल्या कर्तृत्वातून दिला आहे. संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील नवनिर्माण कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवून आरजूने केवळ स्वतःचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर ग्रामीण भागातील मुलींसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.
आरजूच्या या प्रवासाचा पाया फुणगूसच्या मातीतच रचला गेला. प्राथमिक शिक्षणासाठी पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद मराठी शाळेत जाताना तिला दररोज घरून दीड किलोमीटर जावे लागायचे आणि पुन्हा दीड किलोमीटर चालत यावे लागायचे. लहान वयात दररोज होणारा हा ३ किलोमीटरचा पायदळ प्रवास जणू तिला भविष्यातील मोठ्या संघर्षासाठी तयार करत होता. त्यानंतर तिने पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण नवजीवन विद्यालयातून जिद्दीने पूर्ण केले.
खऱ्या अर्थाने तिची कसोटी लागली ती अकरावी आणि बारावीच्या काळात. कसबा ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच कोरोना महामारीचे संकट ओढवले आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली. बस किंवा रिक्षाची कोणतीही सोय नसताना आरजूने हार मानली नाही. फुणगूस ते कसबा हे लांबचे अंतर तिने अनेक महिने पायी चालत पार केले. डोक्यावर ऊन आणि मनात शिक्षणाची ओढ घेऊन केलेली ही पायपीट आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागली आहे.
बारावी उत्तीर्ण झाल्यावर तिने हॉटेल मॅनेजमेंट हा आव्हानात्मक मार्ग निवडला. नवनिर्माण कॉलेजमधील तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करताना तिला मितेश पवार सर आणि भिकाजीराव बेहरे सर या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार पदवी प्रदान सोहळ्यात डॉ. पांडुरंग पाटील, अभिजीत हेगशेट्ये, डॉ. संजना चव्हाण आणि डॉ. प्रज्ञा कदम यांच्या हस्ते आरजूला सन्मानपूर्वक पदवी प्रदान करण्यात आली.
पहिलीच्या वर्गात असताना शाळेसाठी सुरू झालेली ती पायपीट आज एका प्रतिष्ठित पदवीपर्यंत येऊन पोहोचली आहे. आरजूच्या या यशाचे कौतुक करताना गावकरी अभिमानाने सांगत आहेत की, जिद्द असेल तर रस्ते कितीही खडतर असले तरी ध्येय गाठता येते. आरजूने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

