( रत्नागिरी / वार्ताहर )
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत रत्नागिरी येथील श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या नंदिनी चव्हाण हिने रांगोळी स्पर्धेत, तर मार्तंड झोरे याने पोस्टर मेकिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. या दुहेरी यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत रांगोळी स्पर्धेसाठी चुरशीची लढत झाली. या स्पर्धेत नंदिनी चव्हाण हिने आपल्या कल्पकतेचा आणि उत्कृष्ट हस्तकलेचा परिचय देत आकर्षक रांगोळी साकारली. तिच्या कलाकृतीने परीक्षकांची मने जिंकली आणि तिला रौप्यपदक मिळाले. या यशासाठी तिला रांगोळीकार विलास रहाटे यांचे मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. तसेच टीम मॅनेजर सौ. कस्तुरी कदम, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संयोगिता सासने आणि प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांचे प्रोत्साहन मिळाले.
महाविद्यालयाचा अष्टपैलू कलाकार मार्तंड झोरे याने पोस्टर मेकिंग स्पर्धेत रौप्यपदक मिळवत महाविद्यालयाच्या यशात भर घातली. प्रभावी संकल्पना आणि उत्कृष्ट कलाकृतीच्या जोरावर त्याने परीक्षकांची प्रशंसा मिळवली. मार्तंडचे हे सलग दुसरे यश असून, त्याच्या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या कला क्षेत्रातील यशाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे. त्याला फाईन आर्टचे डायरेक्टर विलास रहाटे यांचे मार्गदर्शन लाभले.
एकाच युवा महोत्सवात वादविवाद, रांगोळी आणि चित्रकलेच्या विविध प्रकारांत महाविद्यालयाने मिळवलेल्या घवघवीत यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी कीर विधी महाविद्यालयाच्या चमूचे अभिनंदन केले.


