(गणपतीपुळे / वैभव पवार)
श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात आश्विन पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या दीपोत्सवाची कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेला भक्तिभावपूर्ण वातावरणात सांगता झाली. महिनाभर चाललेल्या या दीपोत्सवात हजारो भाविकांनी सहभागी होत दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या मंदिराचे विलोभनीय दृश्य अनुभवले.
शके १९४८ मधील कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत, म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२६ ते २४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान दररोज मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. दररोज सायंकाळी सात वाजता तेलाचे दिवे आणि पणत्या प्रज्वलित करून संपूर्ण मंदिर व परिसर प्रकाशमय करण्यात येत होता. त्यानंतर आरती, मंत्रपुष्प आणि प्रार्थना झाल्यावर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत असे. अशा प्रकारे दररोजच्या दीपोत्सवाची सांगता होत होती.
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे आरतीच्या कालावधीत मंदिरातील विद्युत ऊर्जेवरील सर्व दिवे, पंखे आणि विद्युत रोषणाई नेहमीप्रमाणे बंद ठेवण्यात येत होती. त्यामुळे तेलाच्या दिव्यांच्या मंद आणि प्रसन्न प्रकाशात मंदिर परिसराचे वातावरण अधिकच तेजोमय होत होते.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी या दीपोत्सवाची विशेष सजावट करण्यात आली होती. मंदिरातील गाभारा आणि त्रिपुर उजळून निघाले होते. याशिवाय मंदिर आणि परिसरात सुमारे पाच हजारांहून अधिक तेलाचे दिवे आणि पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दीपप्रकाशाने उजळून निघाला होता.
महिनाभर चालणाऱ्या या धार्मिक उत्सवाची जय्यत तयारी आणि नियोजन संस्थान श्री देव गणपतीपुळे पंचकमिटी तसेच पुजारी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे करण्यात आले होते.
या विलोभनीय दीपोत्सवाला आणि सांगता सोहळ्याला हजारो गणेशभक्तांनी उपस्थिती लावली. दीपोत्सवातील भक्तिमय वातावरणाचा आणि दीपप्रकाशाने उजळलेल्या मंदिराच्या मनोहारी दृश्याचा भाविकांनी आनंद घेतला, अशी माहिती मंदिराचे पुजारी डॉ. श्री. चैतन्य वासंती वामन घनवटकर यांनी दिली.


