(गुहागर /रत्नागिरी)
गुहागर तालुक्यातील रानवी येथील बीएसएनएलच्या टेलिफोन एक्स्चेंजमधील पॉवर प्लांट रूम फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २५ हजार रुपये किमतीची डीसी पॉवर कॉपर केबल आणि बसबार प्लेट चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. एकूण २५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.१५ वाजेपर्यंतच्या कालावधीत रानवी येथील टेलिफोन एक्स्चेंजच्या पॉवर प्लांट रूममध्ये झाली. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून कार्यालयात प्रवेश केला आणि तेथील विद्युत यंत्रणेशी संबंधित साहित्य चोरून नेले. चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये २५ हजार रुपये किमतीची सुमारे ५० मीटर लांबीची लाल-निळ्या रंगाची, १५० चौरस मिलिमीटर क्षमतेची जुनी वापरती डीसी पॉवर कॉपर केबल आणि ४५० रुपये किमतीची डीसी-डीबी बॉक्सची बसबार प्लेट यांचा समावेश आहे. या घटनेमुळे दूरसंचार केंद्रातील साहित्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी बीएसएनएलचे ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर विजेंदर गुलेरिया (वय ३८, सध्या रा. गुरववाडी, गुहागर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चोरी करणाऱ्या व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नसून, गुहागर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


