(गुहागर/ रत्नागिरी)
मुलीला अंगणवाडीतून घेऊन पायी घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने भरदिवसा हिसकावून नेल्याची घटना गुहागर तालुक्यातील वडद येथे घडली. बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वडद काजुवाडी ते वडद कुंभारवाडी या मार्गावर वडद शाळा क्रमांक २ जवळ ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टी विनायक राऊत (वय २६, रा. वडद कुंभारवाडी, ता. गुहागर) या आपल्या मुलगी स्वराला अंगणवाडीतून घेऊन वडद काजुवाडी येथून कुंभारवाडीच्या दिशेने पायी घरी जात होत्या. अंगणवाडीपासून सुमारे पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या वडद शाळा क्रमांक २ जवळ त्या पोहोचल्या असता, काळ्या रंगाच्या दुचाकीवरून एक अज्ञात व्यक्ती तेथे आली. अंगात हिरव्या रंगाचा शर्ट, डोक्यावर हेल्मेट आणि चेहऱ्यावर मास्क घातलेल्या या व्यक्तीने संधी साधत राऊत यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जोरात हिसकावले आणि क्षणात दुचाकीवरून वडद काजुवाडीच्या दिशेने पलायन केले.
या मंगळसूत्राचे वजन सुमारे २ तोळे ३ ग्रॅम असून, त्याची किंमत अंदाजे २ लाख रुपये आहे. तीन पदरी असलेल्या या मंगळसूत्रात सोन्याचे चपटे पान होते. चोरट्याच्या दुचाकीची कंपनी अथवा क्रमांक फिर्यादीला समजू शकलेला नाही. या प्रकरणी सृष्टी राऊत यांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०४ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


