(रत्नागिरी /प्रतिनिधी)
नियम, पारदर्शकता आणि लोकशाही संकेत धाब्यावर बसवून केवळ सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने कारभार रेटून नेणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाचा बुरखा अखेर फाटला आहे. १५ व्या वित्त आयोगाचा विकास आराखडा मंजूर करताना शासन निर्णयाची सर्रास पायमल्ली करून विरोधी पक्षाच्या सदस्यांना अंधारात ठेवल्याप्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करून १५ दिवसांत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे फर्मान कोकण विभागाचे अपर आयुक्त (विकास) डॉ. माणिक दिवे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) सोडल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव (शिवसेना – उबाठा) यांनी या मनमानी कारभाराविरोधात कोकण विभागीय आयुक्तांकडे पुराव्यानिशी लेखी तक्रार दाखल केली होती. त्यावर विभागीय आयुक्तालयाने कठोर पावले उचलत जिल्हा परिषद प्रशासनाला चांगलाच दणका दिला आहे. मंगळवारी (२४ नोव्हेंबर) जाधव यांनी जिल्हा परिषदेत अधिकृतपणे ही माहिती देत प्रशासनाच्या अपारदर्शक कारभाराचे वाभाडे काढले. ग्रामविकास विभागाच्या १ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार, १५ व्या वित्त आयोगाचा प्रारूप आराखडा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तपासून ‘परिशिष्ट ६’ मधील विहित नमुन्यात सर्वसाधारण सभेसमोर ठेवणे बंधनकारक आहे.
मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषदेत या नियमांना हरताळ फासण्यात आला. ३० जून २०२६ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सदस्यांसमोर कामांची कोणतीही यादी किंवा ‘परिशिष्ट ६’ न ठेवताच २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांच्या कोट्यवधींच्या निधीला परस्पर मंजुरी देण्यात आली. इतकेच नव्हे, तर १ सप्टेंबर २०२६ च्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तातूनही ‘परिशिष्ट ६’ गायब असल्याचे जाधव यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सीईओ आणि अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
जिल्हा परिषद अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कायदेशीर कार्यपद्धतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत सत्ताधाऱ्यांचा अजेंडा रेटून नेल्याचा थेट आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. सभागृहात आणि सभागृहाबाहेर वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने समाधानकारक उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही. यापूर्वी खेड पंचायत समितीतील विरोधी सदस्यांनीही निधीतील असमानतेबाबत सीईओंकडे दाद मागितली होती; मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समन्वय साधण्याऐवजी सीईओ केवळ एकाच बाजूने झुकत असल्याची तीव्र भावना या निमित्ताने समोर आली आहे.
प्रशासनाची कोंडी होणार?
विरोधी सदस्यांना विश्वासात घेऊन आणि सर्वसमावेशक पद्धतीने आराखडे नियमित करावेत, अन्यथा या बेकायदेशीर आराखड्याला तीव्र विरोध राहील, असा इशारा विक्रांत जाधव यांनी २ ऑक्टोबरच्या पत्राद्वारे दिला होता. त्याची दखल घेत अपर आयुक्त डॉ. माणिक दिवे यांनी २८ ऑक्टोबर रोजी चौकशीचे आदेश पारित केले. स्वतःच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाला आता १५ दिवसांत या ‘अंधाऱ्या’ कारभाराचा हिशेब विभागीय आयुक्तांसमोर द्यावा लागणार असल्याने, प्रशासन काय स्पष्टीकरण देते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


