(रत्नागिरी /प्रतिनिधी)
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे हत्याकांड खटल्यातील एका महत्त्वाच्या डिजिटल पुराव्यावरून निर्माण झालेला तांत्रिक पेच रत्नागिरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने मोडीत काढला आहे. खटल्यातील ‘मुद्देमाल क्रमांक २४’ असलेल्या मोबाईल संचाची बॅटरी उतरल्याने साक्ष नोंदवताना निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी, हा मोबाईल थेट न्यायालयाच्या सभागृहातच चार्ज करण्याचे स्पष्ट आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. आंबळकर यांनी २४ नोव्हेंबर २०२६ रोजी दिले. आरोपीचे वकील आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पारदर्शकपणे ही प्रक्रिया पार पाडावी, असेही न्यायालयाने बजावले आहे.
राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्पाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पत्रकार शशिकांत वारीशे यांनी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी एका स्थानिक दैनिकात मुख्य संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच भरधाव मोटारीने धडक देऊन वारीशे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा ठपका तपास यंत्रणेने ठेवला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर तीव्र संतापाची लाट उसळली होती. सध्या रत्नागिरी न्यायालयात या प्रकरणाचा खटला (क्रमांक १५/२०२३) सुरू आहे. या खटल्यात सरकारी पक्षाचे २९ वे साक्षीदार यांची सरतपासणी सुरू असताना एका वृत्तपत्रीय बातमीच्या देवाणघेवाणीचा मुद्दा ऐरणीवर आला. सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार, आरोपी पंढरीनाथ व्ही. आंबेरकर याने एक वृत्तपत्रीय बातमी भरत मिरगुळे यांना पाठवली होती आणि मिरगुळे यांनी ती पुढे शैलेश पाटील यांना पाठवली. जप्तीच्या वेळी शैलेश पाटील यांनी हीच बातमी पोलिसांना मोबाईलवर दाखवली होती. तपासादरम्यान हस्तगत केलेला हाच मोबाईल संच ‘मुद्देमाल क्रमांक २४’ म्हणून न्यायालयात दाखल आहे.
साक्षीदारासमोर या मोबाईलमधील माहिती पडताळण्याचा प्रयत्न केला असता, त्याची बॅटरी पूर्णपणे उतरल्याचे (डिस्चार्ज) निदर्शनास आले. त्यामुळे मोबाईल चार्ज करून त्यातील मजकूर साक्षीदाराला दाखवण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज सरकारी पक्षाने केला. या मागणीला आरोपीच्या वकिलांनी कडाडून विरोध दर्शवला. “तपास अधिकाऱ्यांनी हा मोबाईल न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडे (एफएसएल) पाठवून त्यातील माहितीची अधिकृत प्रत घेणे आवश्यक होते; मात्र तसे झालेले नाही. आता अन्य चार्जरच्या सहाय्याने संच चार्ज केल्यास त्यातील मूळ माहिती (डेटा) नष्ट होण्याची किंवा पुराव्याचे स्वरूप बदलण्याची दाट शक्यता आहे,” असा तांत्रिक युक्तिवाद करत बचाव पक्षाने अर्ज फेटाळण्याची मागणी केली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश ए. एम. आंबळकर यांनी बचाव पक्षाचा आक्षेप अमान्य केला. जप्त केलेला मोबाईल सुरुवातीला पोलीस ठाण्याच्या मालखान्यात आणि त्यानंतर न्यायालयाच्या सुरक्षित मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आला होता, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. “बॅटरी उतरल्यामुळे मोबाईल कार्यरत स्थितीत आहे की नाही, हे चार्ज केल्याशिवाय स्पष्ट होणे शक्य नाही. शिवाय, अन्य चार्जरच्या वापरामुळे आतील माहिती नष्ट होऊ शकते, असे दर्शवणारी कोणतीही बाब अभिलेखावर नाही,” असे परखड निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सरकारी पक्षाचा अर्ज मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे खटल्यातील महत्त्वाचा डिजिटल पुरावा तपासण्याचा मार्ग मोकळा झाला असून, सुनावणीला आता निर्णायक वेग मिळणार आहे.


