(रत्नागिरी / वैभव पवार)
नवोदित कवींना कवितालेखनाची प्रक्रिया समजून घेता यावी, त्यांच्या सर्जनशीलतेला योग्य दिशा मिळावी आणि लेखनाकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी विकसित व्हावी, या उद्देशाने रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी येथे एकदिवसीय कवितालेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई आणि ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सत्कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत स्व. अनंतरावजी बैकर बहुउद्देशीय संकुल येथे ही कार्यशाळा होणार आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबईचे उपाध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते होणार आहे. ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीचे सरपंच सतीश थुळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन तथा आबा पाटील आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कवितेतील आशय, तंत्र, लय, प्रतिमा, मानवी संवेदना, निर्मितीप्रक्रिया आणि समीक्षा यांसारख्या विविध पैलूंवर या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. जीवनानुभव, सामाजिक वास्तव आणि मानवी भावभावना यांना सर्जनशील अभिव्यक्ती देताना कवितेची जडणघडण कशी होते, याची ओळख सहभागी नवकवींना करून दिली जाणार आहे.
रत्नागिरीतील आद्य गजलकार देवीदास पाटील हे ‘कविता लिहिताना : माझा लेखनप्रवास व अनुभव’ या विषयावर मार्गदर्शन करतील. कवी राजू सुर्वे ‘गझल : तंत्र, लय आणि आशय’ या विषयाची मांडणी करतील. मराठी भाषा समितीचे सदस्य तथा समीक्षक प्रा. शिवराज गोपाळे ‘कविता घडते कशी? निर्मिती, वाचन आणि समीक्षा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. युवासाहित्यिक अरुण मोर्ये ‘अनुभवातून कविता : शब्द, प्रतिमा आणि संवेदना’ या विषयावर आपले विचार मांडतील.
केवळ व्याख्याने आणि चर्चेपुरती ही कार्यशाळा मर्यादित राहणार नसून, अखेरीस सहभागी नवकवींना प्रत्यक्ष कविता लिहिण्याचा सरावही करता येणार आहे. प्रशिक्षक अरुण मोर्ये आणि राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष लेखनकौशल्य विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यापूर्वी ज्यांचे कवितेचे एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, मात्र ज्यांना वाङ्मयाची आवड असून लेखनप्रक्रियेचा अभ्यास करण्याची इच्छा आहे, अशा नवकवींना प्रवेश घेता येईल. कार्यशाळा पूर्णतः निःशुल्क असून प्रवेशासाठी ३० जागा मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक जागा दिव्यांग पुरुषासाठी आणि एक जागा दिव्यांग महिलेसाठी राखीव आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नवकवीला सहभाग प्रमाणपत्र आणि लेखणी देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे जिल्हा निरीक्षक हेमंत काळोखे, वाटद जिल्हा परिषद सदस्या उषाताई सावंत, पंचायत समिती सदस्या संजनाताई माने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नवोदित कवींना कवितालेखनासाठी प्रेरणा मिळण्याबरोबरच त्यांच्या लेखनाला आशयाची समृद्धी आणि चिकित्सक दृष्टी प्राप्त व्हावी, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सत्कोंडीच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वाटचालीतही या कार्यशाळेचे योगदान मोलाचे ठरेल, अशी अपेक्षा ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय बैकर यांनी व्यक्त केली.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी अजय काताळे (८०८७८६७१८२), नितीन जाधव (८२७५४३१२९८), संजय बंडबे (७५४४९९१७५९) आणि निलेश थुळ (८७८८७४११९७) यांच्याशी संपर्क साधावा.


