(देवळे / प्रकाश चाळके)
संतांनी आपल्या लेखनातून आणि अभंगांतून दिलेली शिकवण समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी वासुदेवाच्या पारंपरिक वेशभूषेतून समाजप्रबोधनाचे कार्य करण्याचा प्रयत्न गणेश वायकर आणि राजू घाडगे हे करत आहेत. लोप पावत चाललेली वासुदेव कला आणि परंपरा जतन करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा संकल्प आहे. शिवकाळापासून चालत आलेली ही परंपरा आणि समाजप्रबोधनाचे कार्य अखंड सुरू राहावे, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
मळेगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील वासुदेव परंपरा जपणारे गणेश राजू वायकर आणि राजू ज्ञानेश्वर घाडगे यांनी या परंपरेविषयी माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ महाराज पैठणकर यांनी वासुदेव ही प्रथा आणि परंपरा सुरू केली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या परंपरेचा उपयोग गुप्तहेरगिरीसाठीही करण्यात आला. बहिर्जी नाईक यांनी वासुदेवाच्या वेशात अनेकदा गुप्तहेरगिरी केली. विविध ठिकाणांहून माहिती गोळा करून धर्मरक्षणाच्या कार्यासाठी ती बहिर्जी नाईक यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या काळात वासुदेव ही पारंपरिक कला आणि प्रथा हळूहळू लोप पावत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. ही परंपरा टिकविण्यासोबतच समाजात प्रबोधनाचे कार्य सुरू ठेवणे, हाच आपला मुख्य उद्देश असल्याचे राजू वायकर यांनी स्पष्ट केले.
समाजाचा पारंपरिक वासुदेवांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत असल्याचे गणेश वायकर आणि राजू घाडगे यांनी सांगितले. समाजात काही लोकांकडून चोरी, लबाडी आणि फसवणुकीसारखे प्रकार घडत असल्याने त्याचा परिणाम प्रामाणिकपणे परंपरा जपणाऱ्या वासुदेवांवरही होत आहे. त्यामुळे खऱ्या वासुदेवांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. यामध्ये समाजाचा दोष नसून सध्याची परिस्थिती त्याला कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले.
एकनाथ महाराज पैठणकर यांनी सुरू केलेल्या या परंपरेत बारा प्रकारांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये गोंधळी, पिंगळा, नंदीबैल, ज्योतिषशास्त्र, पोतराज, देवीवाले, मरीआई, वासुदेव, मनकवडी, नाथपंथी, बहुरूपी आणि तेलभुते या बारा प्रकारांचा समावेश आहे.
ही परंपरा पुढे चालू राहावी, यासाठी गेल्या तीन पिढ्यांपासून आपले कुटुंब प्रयत्नशील असल्याचे गणेश वायकर आणि राजू घाडगे यांनी सांगितले. समाजाने साथ दिल्यास धर्मरक्षण आणि समाजप्रबोधनाचे हे कार्य आपणच नव्हे, तर आपली पुढील पिढीदेखील सुरू ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवकाळात एकनाथ महाराज पैठणकर यांच्या आशीर्वादाने बहुरूपी परंपरेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मरक्षणाच्या कार्याला गुप्तहेरगिरीद्वारे हातभार लावता आला, याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.


