(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रेल्वे प्रवासादरम्यान महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या प्रकरणात चोरीचे दागिने खरेदी केल्याचा आरोप असलेल्या ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकाला रत्नागिरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. केवळ सहआरोपीने दिलेल्या जबाबाच्या आधारे अर्जदाराला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवतानाच, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अन्वये अर्जदाराला नोटीस बजावल्याचे तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्यात स्पष्ट होत नसल्याची बाब न्यायालयाने अधोरेखित केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. आंबळकर यांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी हा आदेश दिला.
बालाजी प्रकाश काळे (वय ३७) असे अटकपूर्व जामीन मिळालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते ठाणे जिल्ह्यातील वासिंद परिसरातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक २८/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३१७(२) आणि ३(५) अन्वये त्यांच्यावर आरोप आहेत. अभियोग पक्षाच्या कथनानुसार, ५ मार्च २०२६ रोजी शालिनी कदम या रत्नागिरी-दिवा पॅसेंजरने प्रवास करीत होत्या. रात्री साडेनऊच्या सुमारास सापे-वामने रेल्वे स्थानकावर उतरत असताना त्यांच्या खांद्यावरील पर्समधील सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३१/२०२६ दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.
तपासादरम्यान गुन्हा क्रमांक ३०/२०२६ मध्ये अटकेत असलेला विश्वास काळे याने अन्य आरोपींसह चोरी केल्याचे आणि चोरीचे दागिने पत्नी लक्ष्मी हिच्यामार्फत बालाजी काळे यांना विकल्याचे निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. लक्ष्मी काळे हिच्या मोबाईलच्या कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे अर्जदाराशी तिचा संपर्क असल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी न्यायालयात नमूद केले. अर्जदाराचा मोबाईलवरून संपर्क साधण्याचा तसेच त्यांच्या राहत्या घरी आणि गावी शोध घेण्याचा प्रयत्न करूनही ते उपलब्ध झाले नसल्याचे तपास अधिकाऱ्याचे म्हणणे होते. तपास पूर्ण झाल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात अर्जदाराला फरार दाखविण्यात आले होते. मात्र, अर्जदाराने आपल्यावरील आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचा दावा केला. तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाले आहे. कोणतीही वस्तू जप्त करण्यासाठी आपली पोलीस कोठडी आवश्यक नसून, तपासात सहकार्य करण्याची तयारी असल्याचे त्यांनी जामीन अर्जात नमूद केले. शिक्षक म्हणून नोकरी करीत असताना विनाकारण अटक आणि पोलिसांकडून त्रास होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.
पोलिसांनी जामीन अर्जाला विरोध करताना चोरीचे दागिने अद्याप जप्त झाले नसल्याने त्या अनुषंगाने तपास बाकी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. चोरीचे असल्याची माहिती असूनही अर्जदाराने दागिने खरेदी केल्याचा आरोपही पोलिसांनी केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने तपासातील बाबींचे अवलोकन केले. अर्जदाराविरुद्धची कारवाई ही सहआरोपी लक्ष्मी काळे हिने दिलेल्या जबाबाच्या आधारे करण्यात येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. यापूर्वीही याच आरोपींविरुद्ध अशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याचे नमूद करताना, अर्जदाराला अटक करण्यापूर्वी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावल्याचे तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्यात स्पष्ट होत नसल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.
तसेच, इतर आरोपींकडूनही अन्य सोन्याचे दागिने जप्त केल्याची नोंद अभिलेखावर नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. आरोपांचे स्वरूप, तपासाची सद्यस्थिती, गुन्ह्यासाठी निर्धारित असलेली तीन वर्षांपर्यंतची शिक्षा आणि नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेबाबतची बाब विचारात घेता अर्जदाराला अटकपूर्व जामीन देणे उचित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार, अर्जदाराला अटक झाल्यास ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या जामिनदारावर मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले.
तसेच २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान दररोज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संबंधित पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आणि तपास अधिकाऱ्याने बोलावल्यास चौकशीसाठी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. साक्षीदारांशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये, त्यांच्यावर दबाव आणू नये, अशी अटही न्यायालयाने घातली आहे.


