(संगमेश्वर / प्रतिनिधी)
आई-वडिलांचे स्मरण केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न ठेवता, त्यांनी दिलेले संस्कार समाजसेवेच्या माध्यमातून जपण्याचा प्रेरणादायी उपक्रम लक्ष्मी वात्सल्य संस्थेचे अध्यक्ष, निखिल लॉजिस्टिकचे मालक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख तथा वडाळा विधानसभा प्रमुख सुरेश कदम यांनी राबविला. पितृपक्षात आई-वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘ताटापलीकडील श्राद्ध’ हा उपक्रम कृतज्ञता, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम ठरला.
आई-वडिलांनी दिलेली शिकवण आणि माणुसकीची मूल्ये समाजाच्या उपयोगी पडावीत, या भावनेतून सुरेश कदम यांनी प्रथम आई-वडिलांचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पंचक्रोशीतील नागरिकांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सहभागी झालेल्या जोडप्यांना आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भेटवस्तू देण्यात आल्या. या माध्यमातून त्यांच्या आठवणींना भावपूर्ण उजाळा देण्यात आला.
या उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक क्षेत्रालाही मदतीचा हात देण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने लक्ष्मी वात्सल्य संस्थेच्या वतीने माध्यमिक विद्यालय, सोनवडे या शाळेला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच ‘निव्याचा राजा’ गणपती बाप्पा मंडळाला जनरेटर भेट देऊन सार्वजनिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना सहकार्य करण्यात आले.
लक्ष्मी वात्सल्य संस्था क्रीडा स्पर्धा, भजन स्पर्धा, टिपरी नृत्य स्पर्धा आणि पंढरपूर वारी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रांत योगदान देत आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, स्थानिक कलांना प्रोत्साहन देणे आणि गरजूंपर्यंत मदत पोहोचविणे, या कार्यातून संस्थेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित होते.
आई-वडिलांच्या स्मृती जपताना त्यांनी दिलेली मूल्ये कृतीतून पुढे नेणे, हाच त्यांच्या संस्कारांचा खरा सन्मान आहे. अन्नदान, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत आणि सार्वजनिक उपक्रमांना सहकार्य अशा विविध माध्यमांतून सुरेश कदम यांनी पालकांविषयीची कृतज्ञता समाजहिताच्या कार्याशी जोडली आहे. धार्मिक परंपरेला सामाजिक सेवेची जोड देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, सुरेश कदम यांच्या या सेवाभावी प्रयत्नांचे कौतुक होत आहे.


