(गुहागर / रत्नागिरी प्रतिनिधी)
तालुक्यातील पडवे येथील रहिमत मोहल्ला परिसरात मोहरमच्या दिवशी किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून गुहागर पोलिसांनी १३ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी मोहरमच्या पार्श्वभूमीवर परिसरातील एका व्यक्तीच्या निधनामुळे मुख्य मिरवणूक रद्द करण्यात आली होती. मात्र, सायंकाळी साडेसातच्या सुमारास परिसरातील काही लहान मुले प्रतीकात्मक मोहरम मिरवणूक काढत असताना आरोपींपैकी एकाच्या घरासमोर वाद्ये वाजविण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. मुलांनी पुढे जाण्यासाठी वाट करून देण्याची विनंती केल्यानंतर हा किरकोळ वाद चिघळला आणि त्याचे रूप हाणामारीत झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मुलांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या फिर्यादी आणि अन्य नागरिकांनाही आरोपींनी लक्ष्य केल्याचा आरोप आहे. झटापटीदरम्यान दिलबर टेमकर यांना मारहाण करून जमिनीवर पाडण्यात आले. या गोंधळात त्यांची सोन्याची चैन हरवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शाहिदा सारंग यांना मारहाण करून त्यांचा हात पिरगळण्यात आल्याचा, तर कौसर तवसाळकर यांच्या डोक्यात मटका मारून दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नाझिया जांभारकर यांचा बुरखा ओढून त्यांना जमिनीवर ढकलल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे.
याच घटनेनंतर रात्रीच्या सुमारास आरोपी फिर्यादीच्या घरासमोर आल्याचा आरोप असून, त्यांनी शिवीगाळ करत फिर्यादीचे पती आणि मुलांना बाहेर बोलावून जीवे मारण्याची तसेच घर जाळून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी फिर्यादी महिलेला मारहाण करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून तोडल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुहागर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५१(२), ३५२, १३१ आणि ३२४(४) अन्वये १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पडवे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत पुढील तपास सुरू केला असून, घटनेतील सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.

