(गुहागर / रत्नागिरी)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथून ७२ वर्षीय गणपत बाबाजी निवाते हे घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाले आहेत. नातेवाइकांनी परिसरात तसेच परिचितांकडे शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नसल्याने, अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपत निवाते हे ७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास आबलोली येथील राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात आणि नातेवाइकांकडे त्यांचा शोध घेतला; मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत. गणपत निवाते यांचे भाऊ तुकाराम बाबाजी निवाते (वय ६०, निवृत्त शिक्षक, रा. आबलोली, ता. गुहागर) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
गणपत यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गुप्तपणे आणि बेकायदेशीररीत्या रोखून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केले असावे, असा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. बेपत्ता गणपत निवाते यांचे मूळ गाव खोडदे-निवातेवाडी असून, सध्या ते आबलोली येथे वास्तव्यास होते. त्यांच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुहागर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


