(गुहागर)
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था, रत्नागिरीने अल्पावधीत ग्राहकांचा ठाम विश्वास संपादन करत सलग सात वर्षे ‘अ’ वर्गाचा मान राखण्याचा विक्रम केला आहे. ३७ कोटींपेक्षा अधिक भागभांडवल, पाच शाखांमधील सक्षम आर्थिक उलाढाल, ठेवीदारांना आकर्षक ९% व्याजदर, तसेच सभासदांना दिला जाणारा भरघोस लाभांश यामुळे संस्थेने रत्नागिरीतील सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्त रत्नागिरी, गुहागर आणि दापोली येथे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याच अनुषंगाने गुहागर तालुक्यातील साखरी आगर येथे भरविण्यात आलेल्या मुख्य मेळाव्यास पंचक्रोशीतील ग्राहकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
अत्याधुनिक संगणकीकरण, NEFT सेवा, QR कोड सुविधा, मोबाईल बँकिंग, सोनेतारणासह सुरक्षित लॉकर व्यवस्था, CCTV आणि सुरक्षा अलार्म अशा आधुनिक सुविधांमुळे पतसंस्थेने हजारो ग्राहकांचा विश्वास जपला असल्याचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी सांगितले.
ग्राहकांच्या मागण्यांना प्रतिसाद म्हणून साखरी आगर विभागासाठी नवीन सेवा केंद्र सुरू करण्याची घोषणा या मेळाव्यात करण्यात आली. नव्या केंद्रामुळे आर्थिक व्यवहारांसाठी दूरच्या शाखेत जावे लागणाऱ्या ग्राहकांचा वेळ आणि खर्च दोन्ही मोठ्या प्रमाणात वाचणार असून स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
या कार्यक्रमास अध्यक्ष संतोष पावरी, उपाध्यक्ष सुधीर वासावे, संचालक वासुदेव वाघे, कमलाकर हेदवकर, कृष्णा तांडेल, प्रभारी कार्यकारी अधिकारी दौलत नाटेकर, पालशेत शाखाधिकारी गणेश ढोर्लेकर, कर्मचारी अविनाश म्हातनाक, समन्वय समिती पदाधिकारी अनिल जागकर, प्रकाश नाटेकर, प्रभाकर शिरगावकर, मारूती होडेकर तसेच पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला सभासद, हितचिंतक आणि ग्राहकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

