(गुहागर / सचिन कुळये)
गुहागर तालुक्यातील नरवण गावातील श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव यंदाही दिमाखात पार पडला. श्रद्धेची खरी परीक्षा मानला जाणारा हा पारंपरिक सोहळा पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कार्तिक कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा होणारा हा उत्सव भक्तांच्या दीर्घकालीन नवसफेडीचा विशेष दिवस मानला जातो.
सायंकाळी मंदिर प्रांगणात आकडे टोचणे आणि लाट फिरवण्याचा विधी पार पडला. देवीवरील अपार श्रद्धेने भाविक स्वेच्छेने पाठीवर लोखंडी हुक टोचून घेतात आणि चढत्या लाटेवर अधांतरी फेऱ्या मारत आपला नवस पूर्ण करतात. या अनोख्या परंपरेमुळे उत्सवाचे वेगळेपण सातत्याने जपले जात आहे.
उत्सवाच्या प्रांगणात सुमारे तीस फूट उंचीचा खांब आणि तितक्याच लांबीची सागवानी लाट उभारण्यात येते. देवीचे मानकरी, तसेच नवस फेडणारे भक्त हुक टोचल्यानंतर लाटेवरून गोलगोल फिरवले जातात. त्या वेळी भक्त मोठी घंटा हातात धरून देवीचा जयजयकार करीत असतात, तर ग्रामस्थ लाट फिरवण्याचे काम करतात.
विशेष म्हणजे, आकडा टोचल्यानंतर भक्तांच्या पाठीवरून रक्त येत नाही किंवा कोणतीही इजा होत नाही, हे नरवण बगाडा उत्सवाचे खास वैशिष्ट्य मानले जाते. नवस फेडणारे भक्त साधारणपणे पाच फेऱ्या पूर्ण करून पूजा अर्पण करतात.
यंदाच्या उत्सवात एकूण ७ आकडे टुपण्यात आले. दोन-एक फेऱ्यानंतर भक्तांना सुरक्षितरित्या लाटेवरून खाली उतरवून देवीला नमस्कार घालण्यात आला. श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाने भारलेला हा सोहळा पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले.

