(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील किल्ला परिसरात तीव्र उतारावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रेम भिम ओड असे मृताचे नाव असून, १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी लाईट हाऊस ते हनुमान स्टॉपदरम्यान हा अपघात घडला होता. या अपघातात दुचाकीवरील अन्य प्रवाशांनाही दुखापत झाली होती. तपासानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी मृत दुचाकीस्वाराविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम ओड हा १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एमएच-०८-एए-०२२६ क्रमांकाच्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून लाईट हाऊस ते हनुमान स्टॉप, किल्ला या मार्गाने जात होता. त्याच्यासोबत पत्नी कोमल, मेहुणी हिमा शेर ओड आणि दोन लहान मुले होती. किल्ला परिसरातील तीव्र उतारावरून जात असताना रस्त्याच्या स्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता दुचाकी निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे चालविल्याने अपघात झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अपघातात प्रेम ओड याच्यासह अन्य प्रवाशांना दुखापत झाली. प्रेम याला प्रथम रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, २१ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची सुरुवातीला सावर्डे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित कागदपत्रे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आली. शहर पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला. पोलीस हवालदार बाळू रमेश पालकर यांनी केलेल्या तपासात अपघातासंदर्भातील बाबी समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


