(गुहागर /रत्नागिरी प्रतिनिधी)
डिजिटल इंडियाच्या युगात सायबर गुन्हेगारांचे धाडस आता गगनाला भिडले असून, थेट केंद्रीय तपास यंत्रणांच्या (CBI) नावाचा वापर करून सर्वसामान्य आणि निष्पाप नागरिकांना लुटण्याचे सत्र थांबायला तयार नाही. असाच एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यात उघडकीस आला आहे. बंगळुरू सीबीआय कार्यालयातून बोलत असल्याची हुशारी दाखवून, एका ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चक्क १५ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. अटकेची कायदेशीर भीती दाखवून आणि मानसिक छळ करून सायबर भामट्याने या वृद्ध निवृत्त कर्मचाऱ्याची आयुष्यभराची पुंजी लुटली. याप्रकरणी संदीप दिवान (पूर्ण नाव, पत्ता अज्ञात, रा. बंगळुरू) या भामट्याविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमधून निवृत्त झालेले विजय सहदेव गडदे (वय ६८) हे गणेशोत्सवानिमित्त गुहागर तालुक्यातील किर्तनवाडी या आपल्या मूळ गावी आले होते. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे सर्व काही शांत सुरू असताना, त्यांच्या मोबाईलवर एक व्हॉट्सॲप कॉल खणखणला. समोरून बोलणाऱ्या आरोपीने आपण सीबीआय बंगळुरू येथून बोलत असल्याचे सांगत गडदे यांच्या पायाखालची जमीनच सरकवली. “सदाकत खान नावाच्या व्यक्तीने तुमच्या नावाने कॅनरा बँकेच्या मुलुंड शाखेत खाते उघडून तब्बल तीन कोटी रुपयांची अवैध आर्थिक उलाढाल केली आहे आणि या व्यवहाराच्या मोबदल्यात तुम्हाला ३० लाख रुपये मिळाले आहेत,” असा खोटा आणि गंभीर आरोप या भामट्याने केला. गडदे यांनी आपल्या खात्यात केवळ २० हजार रुपये असल्याचे सांगत कॉल कट केला, पण सायबर दरोडेखोराचे जाळे तिथेच संपले नव्हते. काही वेळातच आरोपीने व्हॉट्सॲपवर तक्रार दाखल झाल्याची एक खोटी प्रत पाठवून गडदे यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार दाखवली. मात्र, स्वतःच पाठवलेला हा पुरावा नंतर डिलीट करून टाकण्यात आला. “जर अटकेपासून वाचायचे असेल, तर तपासासाठी आम्ही सांगू त्या खात्यावर पैसे जमा करावे लागतील,” अशी धमकी देत आरोपीने वृद्धाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे हतबल केले.
१ ऑक्टोबर रोजी फिर्यादी मुंबईतील मुलुंड पूर्व येथील नवघर परिसरात असतानाही या भामट्याने त्यांचा पिच्छा सोडला नाही. वारंवार व्हॉट्सॲप कॉल करून त्याने चक्क २५ लाख रुपयांची मागणी लावून धरली. अखेर भीतीपोटी आणि मानसिक दबावाखाली येऊन, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी गडदे यांनी आरोपीने दिलेल्या बँक खात्यावर आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) खात्यातून १५ लाख रुपयांचा धनादेश लिहून दिला. मुलुंड पूर्व येथील एसबीआय शाखेत हा धनादेश जमा करण्यास सांगून आरोपीने अत्यंत चालाखीने ही मोठी रक्कम लांबवली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विजय गडदे यांनी गुहागर पोलीस ठाणे गाठून न्याय मागितला.
याप्रकरणी गुहागर पोलिसांनी तातडीने पावले उचलत भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियम २००० मधील कलम ६६(ड) अन्वये गुन्हा क्रमांक ११७/२०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.


