(खेड / वार्ताहर)
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील एम.आर. स्पेशालिटी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, काही कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि खेड पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लोटे एमआयडीसी परिसरात वारंवार घडणाऱ्या औद्योगिक दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगीचे नेमके कारण काय, तसेच प्रत्यक्षात किती आर्थिक नुकसान झाले, याचा तपशील संबंधित यंत्रणांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


