(खेड/ रत्नागिरी)
तालुक्यातील वावे काजू फाटा परिसरात नदीतील खोल डोहात पाय घसरून पडल्याने २२ वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली. मानसी रामचंद्र कदम (रा. धामणंद रोहीदासवाडी, खेड) असे मृत तरुणीचे नाव असून, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानसी ही मंगळवारी सकाळी आईसोबत कपडे धुण्यासाठी वावे काजू फाटा येथील नदीकाठी गेली होती. आई कपडे धुण्यात गुंतलेली असताना काठावर खेळत असलेल्या मानसीचा अचानक तोल गेला आणि ती खोल डोहात पडली. पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच तिची आई रीना कदम यांनी आर्त हाक दिली. त्यांच्या आरडाओरडामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांनी तत्काळ शोधमोहीम राबवत सुमारे अकरा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास मानसीला पाण्याबाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मानसीला प्रथम वावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पथक रुग्णालयात दाखल झाले. पंचनामा करून बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भर उन्हाळ्यात घडलेल्या या दुर्घटनेमुळे धामणंद गावावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

