(दापोली / वार्ताहर)
आरोग्यदायी जीवनशैली, शांतता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी जेसीआय दापोली मॅरेथॉन २०२६ – सिझन ३ ही स्पर्धा आज (शनिवार, दि. १० ऑक्टोबर) रोजी दापोली येथील आझाद मैदानावर उत्साहात पार पडली. ‘रन फॉर पीस, रन फॉर दापोली’ हे घोषवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण २४७ धावपटूंनी सहभाग घेतला. पाच किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये स्वराज जोशी आणि सई चव्हाण यांनी आपापल्या गटांत प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत पाच किलोमीटर आणि दोन किलोमीटर अशा दोन प्रकारांचा समावेश होता. पाच किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये १२४ पुरुष आणि २२ महिला अशा एकूण १४६ स्पर्धकांनी धाव घेतली. दोन किलोमीटरच्या फन रनमध्ये ७८ पुरुष आणि २३ महिला अशा एकूण १०१ धावपटूंनी सहभाग नोंदवला. विविध वयोगटांतील नागरिकांनी दाखवलेला उत्साह हे या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
पाच किलोमीटर पुरुष गटात स्वराज जोशी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. यश शिर्के द्वितीय, तर अथर्व चव्हाण तृतीय क्रमांकावर राहिले. महिला गटात सई चव्हाण यांनी विजेतेपद पटकावले. दीक्षा कडू यांनी द्वितीय, तर पूजा राजभर यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
दोन किलोमीटर फन रनच्या पुरुष गटात पवन गौड यांनी प्रथम क्रमांक मिळवला. सुनील रेवाळे यांनी द्वितीय, तर राज राजेशिर्के यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटात वैदेही गुरव यांनी प्रथम, सोनाली भागणे यांनी द्वितीय आणि जानवी कांबळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
विजेत्यांना आकर्षक चषक, पदके, प्रमाणपत्रे आणि रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. पाच किलोमीटरच्या पुरुष आणि महिला गटांतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ३,००० रुपये, २,००० रुपये आणि १,००० रुपये देण्यात आले. दोन किलोमीटर फन रनमधील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे १,००० रुपये, ७५० रुपये आणि ५०० रुपये अशी रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक धावपटूला सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी दापोलीच्या नगराध्यक्षा सौ. कृपाताई घाग, नगरसेविका सौ. साधनाताई बोत्रे, मुख्य प्रायोजक पितांबरी प्रॉडक्ट्सचे श्री. पराग साळवी, श्री. अरुण गांधी आणि जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेएफएम डॉ. कुणाल मेहता उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वज दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमासाठी पितांबरी प्रॉडक्ट्सने मुख्य प्रायोजक म्हणून सहकार्य केले. स्पर्धेदरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने दापोली पोलिसांनी महत्त्वपूर्ण मदत केली. श्री. सूरज शिगवण यांनी आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, तर प्रांत कार्यालयाकडूनही विशेष सहकार्य लाभले.
या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. साठ वर्षांवरील नऊ ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने धाव घेतली. त्यांच्या जिद्दीचा आणि आरोग्याप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरव करून त्यांना विशेष पदके देण्यात आली. दहा वर्षांखालील जवळपास १४ मुलांनीही स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना एकत्र आणणारा हा उपक्रम ठरला.
स्पर्धेच्या आयोजनासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेएफएम डॉ. कुणाल मेहता, सचिव जेसी एचजीएफ रोशन वेदक, प्रकल्प अध्यक्ष जेसी एचजीएफ मयुरेश शेठ, प्रकल्प संचालक जेसी फैझान पुरकर, प्रकल्प समन्वयक जेसी पार्थ साबळे, तसेच जेएफएम तेजस मेहता, जेसीएचजीएफ सीए ऋषिकेश शेठ, जेसी निहाल शिरगावकर आणि जेसीआय दापोलीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेएफडी कुणाल मंडलिक यांनी केले. स्थानिक माध्यमांच्या प्रतिनिधींनीही उपस्थित राहून या उपक्रमाला प्रसिद्धी दिली.
आरोग्य, क्रीडा, शांतता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मॅरेथॉन जेसीआय दापोलीच्या जनसंपर्क उपक्रमातील महत्त्वपूर्ण ठरली. धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पोलीस प्रशासनाचे सहकार्य आणि प्रायोजकांचे पाठबळ यामुळे स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ‘रन फॉर पीस, रन फॉर दापोली’ या घोषवाक्यातून दापोलीत आरोग्यदायी जीवनशैली आणि शांततेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.


