(संगमेश्वर / प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्तिकी हेल्थकेअर फाउंडेशन, आवाशी आणि आवाशी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आवाशी ग्रामपंचायत हॉल येथे मोफत नेत्रचिकित्सा, योग प्रशिक्षण व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थ, विद्यार्थी, अंगणवाडीतील बालके तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात सहभागी नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. त्याचबरोबर योग प्रशिक्षणाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि दैनंदिन जीवनात आरोग्याची योग्य काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आवाशी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, अंगणवाडीतील बालके तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या उपक्रमाचा लाभ घेतला.
कार्तिकी हेल्थकेअर फाउंडेशनचे संचालक डॉ. सागर अनंत जोगळे हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आवाशी आणि पंचक्रोशी परिसरात वैद्यकीय सेवेसोबतच विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत. ‘वैद्यकीय सेवा हीच सामाजिक बांधिलकी’ या भावनेतून ग्रामीण व तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद ठरत आहे.
यावेळी आवाशी उपकेंद्राच्या डॉ. दमयंती कदम यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शिबिराच्या आयोजनासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच आवाशी प्राथमिक शाळेतील शिक्षकवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजन सकटे यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे सचिव अशोक धाडवे यांनी शिबिराचे नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पंचक्रोशीतील नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध झाले. त्यामुळे या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

