(खेड)
दापोली-खेड मार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसताना, कुंभवे कातळ ते नवशी पाटी दरम्यानच्या पुलावर आज पहाटे आणखी एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील एका कारने पुलावरील दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास दापोलीहून खेडच्या दिशेने येणारी कार नवशी पाटी पुलावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट दुभाजकावर आदळली. धडकेची तीव्रता इतकी होती की वाहनाचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहनातील प्रवाशांना मदत केली. काही काळ या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, दापोली-खेड मार्गावर सध्या रस्ते रुंदीकरण व सुधारणा कामे सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा अभाव असल्याची तक्रार वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. विशेषतः पुलांवर व धोकादायक वळणांवर चेतावणी फलक, रिफ्लेक्टर, दिशादर्शक चिन्हे, बॅरिकेड्स तसेच वेगमर्यादा दर्शविणारे फलक नसल्याने रात्री आणि पहाटेच्या वेळी वाहनचालकांची दिशाभूल होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दापोली हे कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने या मार्गावर वर्षभर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. याशिवाय स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांचीही सतत ये-जा सुरू असते. मात्र अपूर्ण रस्तेकामे, तीव्र वळणे आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे वाहनचालकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. रस्त्यालगत अनेक ठिकाणी शाळा, वस्ती आणि बाजारपेठा असूनही पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या मार्गावर यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात घडले असून सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. मात्र संबंधित यंत्रणांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ताज्या अपघातानंतर तरी प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदारांनी गंभीर दखल घेऊन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तातडीने चेतावणी फलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स आणि अन्य सुरक्षा साधने उभारावीत, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

