(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे २०२६ सालचे विविध पुरस्कार संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी जाहीर केले आहेत. या पुरस्कारांचे वितरण १३ डिसेंबर रोजी आयोजित शानदार कार्यक्रमात करण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक आणि श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. विशेष म्हणजे, या पुरस्कारांसाठी कोणतेही अर्ज मागवले जात नाहीत. संबंधित व्यक्तींच्या कार्याची माहिती घेऊन पुरस्कारार्थींची निवड केली जाते, हे या पुरस्कारांचे वैशिष्ट्य आहे.
यंदा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कारासाठी आर्ना पाटणे (खेड), धन्वंतरी पुरस्कारासाठी डॉ. संतोष बेडेकर (रत्नागिरी), आदर्श पौरोहित्य पुरस्कारासाठी श्रीकृष्ण काजरेकर (कुडाळ), आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सौ. माधुरी कुलकर्णी (रायपाटण), कीर्तनकार पुरस्कारासाठी ह. भ. प. मोहन बुवा कुबेर (नागपूर), उद्योगिनी पुरस्कारासाठी सौ. शुभदा पाध्ये (कुर्धे-मेर्वी), कृषी संजीवन पुरस्कारासाठी नितीन करकरे (संगमेश्वर), तर उद्योजक पुरस्कारासाठी योगेंद्र प्रभाकर हळबे आणि आदित्य प्रदीप तांबे (कान्हे, चिपळूण) यांची निवड करण्यात आली आहे.
खेड येथील ज्ञानदीप विद्यामंदिरची विद्यार्थिनी आर्ना रूपम पाटणे हिला राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. एका शैक्षणिक वर्षात तिची राष्ट्रीय स्तरावरील नेटबॉल स्पर्धा आणि राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली होती. धुळे, भंडारा आणि गोंदिया येथे झालेल्या या स्पर्धांमध्ये तिने यश मिळवले. या क्रीडा प्रवासात तिला क्रीडा शिक्षक संतोष भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या सौ. माधुरी रामचंद्र कुलकर्णी या राजापूर तालुक्यातील जि. प. शाळा रायपाटण नं. ३ येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी साटवली नं. १, कारवली नं. १, रायपाटण नं. १, नेवरे-ढोकमळे आणि पाचल नं. ५ या शाळांमध्ये सेवा बजावली आहे. गणित विषयाचे अध्यापन आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन यांमुळे त्यांचे विद्यार्थी परीक्षेत यशस्वी ठरले आहेत. परसबाग, विद्यार्थी भांडार, बागकाम आणि पाढे पाठांतर अशा उपक्रमांमध्येही त्यांनी योगदान दिले आहे.
उद्योगिनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या सौ. शुभदा महेश पाध्ये या कुर्धे-मेर्वी येथील उद्योजिका आहेत. त्यांनी २००१ मध्ये नाटे येथे काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला. २००७ पासून कुर्धे येथे यंत्रसामग्रीच्या साहाय्याने काजूगर, विविध फ्लेवर्सचे काजूगर आणि काजू बी प्रक्रिया करण्याचे काम त्या करत आहेत. याशिवाय विविध फ्लेवर्सचे केळ्याचे वेफर्स, कोकण प्रॉडक्टची लोणची आणि सरबतांचे उत्पादनही त्या घेतात. रत्नागिरीतील विविध प्रदर्शनांमध्ये त्या सहभागी होतात. तसेच, ऑनलाइन माध्यमांतूनही त्यांच्या उत्पादनांना मागणी मिळते.
धन्वंतरी पुरस्कारासाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष वामन बेडेकर यांची निवड झाली आहे. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे एमबीबीएस आणि पदव्युत्तर एमडी (बालरोग) शिक्षण पूर्ण केले. गेल्या ४० वर्षांपासून ते रत्नागिरीत वैद्यकीय सेवा देत आहेत. अनेक बालरुग्णांच्या आजारपणातील वेदना कमी करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम त्यांनी केले आहे. वृत्तपत्रांमधील लेखन, आकाशवाणीवरील मुलाखती आणि वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातूनही त्यांनी समाजसेवा केली आहे.
डॉ. बेडेकर यांनी आयएमए रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे ३५ वर्षे सक्रिय सदस्य आणि लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे सहा वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच निरीक्षणगृह बालगृह संस्थेचे १५ वर्षे मानद सचिव, अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे दोन वर्षे अध्यक्ष, परशुराम सेवा संघाचे कार्यकारिणी सदस्य आणि स्काय अँड अर्थ संस्थेचे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे.
आदर्श पौरोहित्य पुरस्कारासाठी श्रीकृष्ण सीताराम काजरेकर (कुडाळ) यांची निवड झाली आहे. त्यांनी सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर पुण्यात नवाथे गुरुजी यांच्याकडे अष्टक संहितेचे शिक्षण घेतले. पुढे वे. मू. रामचंद्र टेंगशे (पैंगीण, गोवा) यांच्याकडे त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. विठ्ठल शास्त्री बोरकर यांच्याकडे ज्योतिष आणि याज्ञिक शिक्षण घेतले. रांगोळी काढण्याचा छंद असलेल्या काजरेकर यांनी नाटकांमध्ये अभिनयही केला आहे. याज्ञिकीच्या निमित्ताने त्यांनी गोव्यात २५ वर्षे वास्तव्य केले. गेल्या २० वर्षांपासून ते घोटगे येथे पौरोहित्य करत आहेत.
नागपूर येथील ह. भ. प. मोहन बुवा कुबेर यांना कीर्तनकार पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी एमए (संस्कृत), बी. एड., संगीत विशारद आणि हिंदी कोविद या पदव्या प्राप्त केल्या आहेत. नागपूर येथील धरमपेठ शिक्षण संस्थेतून ते उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाले. वयाच्या सातव्या वर्षापासून बालकीर्तनकार म्हणून सुरू झालेली त्यांची कीर्तनसेवा गेल्या ६० वर्षांपासून सुरू आहे. आजवर त्यांनी २४ हजारांहून अधिक कीर्तने केली आहेत. दासगणू, कवीश्वर, पटवर्धन, शिरवळकर आणि रामदासी पठडीतील कीर्तने ते सादर करतात.
कांची पीठाधीशांकडून त्यांना ‘कीर्तन श्री’ ही पदवी मिळाली आहे. औदुंबर येथील यती महाराजांकडून ‘कीर्तन केसरी’, तर शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांकडून ‘कीर्तन भूषण’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाशी संलग्न कीर्तन महाविद्यालयाचे संस्थापक सदस्य आणि पहिले उपप्राचार्य, अखिल भारतीय कीर्तन संमेलनाचे आयोजक सचिव तसेच वैदर्भीय हरिकीर्तन संस्था, नागपूरचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले आहे.
कृषी संजीवन पुरस्कारासाठी संगमेश्वर येथील नितीन रविंद्रनाथ करकरे यांची निवड झाली आहे. त्यांनी १९८६ ते २००६ या २० वर्षांच्या कालावधीत दूरचित्रवाणी क्षेत्रात फ्रीलान्स फिल्म एडिटर म्हणून काम केले. विविध मालिका, जाहिराती आणि माहितीपटांचे संकलन त्यांनी केले. २००४ मध्ये ‘मामाच्या गावाला जाऊया’ या संकल्पनेतून कोकणातील तुरळ येथे शिबिरांचे आयोजन सुरू केले. २०११ मध्ये ठाणे सोडून ते गावी स्थायिक झाले. तेथे मातीची कॉटेजेस बांधून होम स्टे सुरू केला आणि बंद पडलेली शेती पुन्हा सुरू केली.
सध्या ते भाताच्या तीन प्रकारांसह हळद, आंबेहळद, कुळीथ, पावटे, कडवे, विविध प्रकारच्या भाज्या, कलिंगड, आंबा, कोकम आणि फणस यांचे उत्पादन घेतात. या उत्पादनांपासून लोणची, पिठे, पापड, मोरंबे आणि सरबतांचे उत्पादनही केले जाते. ‘शेतातून ताटात’ या संकल्पनेतून त्यांच्या शेतात पिकणाऱ्या बहुतांश पदार्थांचा आस्वाद पर्यटकांना घेता येतो.
उद्योजक पुरस्कारासाठी चिपळूण तालुक्यातील कान्हे येथील कोकोऑर्गेनिक कोकोनट इंडस्ट्रीजचे संस्थापक योगेंद्र प्रभाकर हळबे आणि आदित्य प्रदीप तांबे यांची निवड झाली आहे. योगेंद्र हळबे यांनी बी. एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) शिक्षण घेतले असून, सीसीआरआय, ॲलेप्पी येथे सर्टिफिकेट कोर्स इन क्वायर टेक्नॉलॉजी पूर्ण केला आहे. आदित्य तांबे यांनी बी. एस्सी. (बायोटेक्नॉलॉजी) आणि एम. एस्सी. (पर्यावरणशास्त्र) शिक्षण घेतले असून, सॉलिड वॉटर वेस्ट मॅनेजमेंट आणि क्वायर टेक्नॉलॉजीचे शिक्षणही पूर्ण केले आहे.
कोकोऑर्गेनिक इंडस्ट्रीजमध्ये २०२० पासून कोकोपीट आणि पायपुसण्यांचे उत्पादन केले जाते. २०२४ पासून नारळाच्या करवंटीपासून विविध उपयुक्त आणि शोभिवंत वस्तू तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. कोकणात राहून नव्या प्रकारचा उद्योग उभारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत त्यांना उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करणाऱ्या रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या या पुरस्कारांकडे लक्ष लागले आहे. येत्या १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सर्व पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात येणार आहे.


