(रत्नागिरी / वार्ताहर)
गोव्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्हाही पर्यटकांचे आकर्षण ठरत असून जिल्ह्याच्या विकासासह पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. हॉटेल आणि फळप्रक्रिया व्यवसायांना उद्योगाचा दर्जा देण्याचा शासनाचा मानस असून, हा दर्जा मिळाल्यास या क्षेत्रांमध्ये अमूलाग्र बदल घडून येईल. पुढील दोन वर्षांत पर्यटकांना जिल्ह्याची पर्यटनविषयक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे पर्यटन विकास केंद्रही विकसित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
हॉटेल विवा येथे रविवारी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, समृद्ध मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स (मुंबई) आणि पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक पर्यटन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुर, समृद्ध कोकणचे संस्थापक संजय यादवराव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, पर्यटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी पर्यटन क्षेत्रासाठी सातत्याने प्रयत्न करणारे राजू भाटलेकर यांचे अभिनंदन केले. पर्यटन परिषद आणि कार्यशाळांच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम भाटलेकर करत असल्याचे त्यांनी नमूद केले. रत्नागिरीत दिवाळी, ३१ डिसेंबर, शिमगा आणि गणपती उत्सवाच्या काळात हॉटेल्समध्ये ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत बुकिंग होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरीत विमानतळ होणार का, याबाबत एकेकाळी शंका उपस्थित करून टीका केली जात होती. मात्र, आता १७० कोटी रुपये खर्च करून येथील एअरस्ट्रिपची लांबी १४०० मीटरवरून २१०० मीटर, तर रुंदी ३० मीटरवरून ४५ मीटर करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी विमानतळावर ८२ सीटर एटीआर विमान सहज उतरू शकणार असून, त्याचा पर्यटनाला अधिक वेग मिळेल, असे सामंत यांनी सांगितले.
उडाण योजनेअंतर्गत देशात कुठेही पाहायला मिळणार नाही, अशी सुसज्ज टर्मिनल बिल्डिंग रत्नागिरीत उभारण्यात आली आहे. या इमारतीत प्रवेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि कोकणी संस्कृतीचे दर्शन घडते. पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक पातळीवरही विविध नावीन्यपूर्ण प्रयोग होत असून, मैत्री ग्रुपने तयार केलेल्या कॉर्न-चीज समोसासारख्या नवीन पदार्थांची त्यात भर पडत असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले.
रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये कोकणातील उत्पादनांना जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी ६ विशेष स्टॉल्स (स्टँड्स) तयार करण्यात आले आहेत. मुंबई तसेच अन्य ठिकाणांहून विमानाने रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना या माध्यमातून कोकम सरबत, सोलकढी यांसारख्या स्थानिक पदार्थांची ओळख करून देता येणार आहे. दरम्यान, रत्नागिरी विमानतळावरून आगामी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू होणार असून, त्यानंतर नागरिकांना विमानाने प्रवास करता येणार असल्याची घोषणा पालकमंत्री सामंत यांनी केली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुधीर तथा भाई रिसबूड यांनी कोकणातील पर्यटन आणि रत्नागिरीत पर्यटन वाढीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या कलाकृती व प्रकल्पांची माहिती दिली. केवळ संकल्पना मांडण्याऐवजी त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर पालकमंत्री सामंत यांचा भर असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश आयरे यांनी केले.
यावेळी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना विशेष ‘पर्यटन मित्र’ सन्मान प्रदान केला. तसेच सुदेश शेट्ये, सतीश कदम, संजय वैशंपायन, सौ. अमृता करंदीकर, ययाती शिवलकर, गौरेश फाळके, गौरव जोशी, महेंद्र मयेकर, प्रसाद देवस्थळी, ओम पाडाळकर, राधेय पंडित, सौ. शहनाज काझी, मानसी यादवराव, आनंद तायशेटे आणि भरत मोरे यांना पर्यटन मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन पालकमंत्री डॉ. सामंत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.


