(गणपतीपुळे / वैभव पवार)
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रानपाट आणि माजी विद्यार्थी संघ रानपाट यांच्या प्रयत्नातून ‘सायबर संस्कार, सायबर सुरक्षा व जबाबदारी’ या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘जय महाराष्ट्र कला पथक रानपाट सभागृह’ येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला बोंड्ये केंद्राचे केंद्र समन्वयक श्री. पाटोळे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शुभेच्छापर भाषणात श्री. पाटोळे सर यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत शाळा आणि माजी विद्यार्थी संघाचे विशेष अभिनंदन केले.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. मयुर गोनबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कमिटीचे सदस्य श्री. श्रीपाद मुकादम यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी सायबर क्षेत्रातील जाणकार डॉ. श्री. अक्षय फाटक यांची भेट घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. भितळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.
पोचरी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पानगले सर यांनीही श्री. भितळे सर यांच्या विनंतीला मान देत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रवृत्त केले.
आजच्या इंटरनेट आणि मोबाईलच्या युगात मोबाईल व इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा, तसेच ऑनलाइन फसवणूक कशी टाळावी, याबाबत मार्गदर्शक डॉ. अक्षय फाटक सर यांनी विद्यार्थ्यांना ओघवत्या आणि विनोदी शैलीत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनादरम्यान विनोदी दाखल्यांना विद्यार्थ्यांकडून वेळोवेळी टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. मयुर गोनबरे, सदस्य श्री. श्रीपाद मुकादम, पोलिस पाटील श्री. सुनिल गोनबरे, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीचे प्रमुख सदस्य श्री. बाळकृष्ण गोनबरे, मुख्याध्यापक श्री. भितळे सर, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या विशेष उपक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. भितळे सर, संघाचे अध्यक्ष श्री. मयुर गोनबरे, सदस्य श्री. श्रीपाद मुकादम तसेच सहकारी श्री. जाधव सर, श्री. माने सर, श्री. पवार सर आणि सर्व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मनोज जाधव यांनी केले, तर आभार श्री. अजय माने यांनी मानले.

