( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बाजारपेठ येथे दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. मालगुंड बाजारपेठ मच्छी मार्केट दुकानदार आणि रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना, मालगुंड यांच्या वतीने या उत्सवाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. यावेळी मालगुंड पंचक्रोशीतील सहा गोविंदा पथकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मालगुंड मच्छी मार्केट परिसरात पाच ते सहा थरांपर्यंतची उंच दहीहंडी आकर्षक पद्धतीने सजवून बांधण्यात आली होती. सहभागी प्रत्येक गोविंदा पथकाला ही दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात आला. मालगुंड भंडारवाडा येथील गोपाळकृष्ण गोविंदा पथक, श्री चंडिका मित्र मंडळ गोविंदा पथक मालगुंड, कुणबी समाज हितवर्धक गोविंदा पथक मालगुंड, जोशीवाडी गोविंदा पथक मालगुंड, श्री जय भैरी गोविंदा पथक भगवतीनगर आणि भैरी भगवती गोविंदा पथक भगवतीनगर या सहा पथकांनी उत्सवात सहभाग घेतला.
सर्व गोविंदा पथकांनी पाच ते सहा थरांची दहीहंडी फोडण्यासाठी सलामी दिली. त्यांच्या या सहभागाबद्दल बाजारपेठ मच्छी मार्केट दुकानदार आणि रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना, मालगुंड यांच्या वतीने रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद सदस्य राजेश उर्फ राजू साळवी यांनी वैयक्तिक स्वरूपात सर्व गोविंदा पथकांना रोख रकमेची पारितोषिके प्रदान केली.
दहीहंडी उत्सवासाठी बाजारपेठ मच्छी मार्केट दुकानदार आणि रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना, मालगुंड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नेटके नियोजन करण्यात आले होते. उत्सवाला आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच खास डीजेच्या आयोजनामुळे उत्सवात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. गोविंदा पथकांची दहीहंडी फोडण्याची स्पर्धा पाहण्यासाठी मालगुंड परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
दहीहंडी उत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात पार पाडण्यासाठी बाजारपेठ मच्छी मार्केट दुकानदार, महिला मंडळ आणि रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना, मालगुंड यांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
या उत्सवाला जिल्हा परिषद सदस्य राजेश उर्फ राजू साळवी, पंचायत समिती सदस्य पूर्वा दुर्गवळी, मालगुंड सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच स्मिता दुर्गवळी, सामाजिक कार्यकर्ते संजय दुर्गवळी, सचिन दुर्गवळी, माजी सरपंच दीपक दुर्गवळी, ग्रामपंचायत सदस्य नितीन दुर्गवळी, पत्रकार वैभव पवार, पोलीस पाटील अमोल राऊत आदी मान्यवरांसह अनेकांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे बाजारपेठ मच्छी मार्केट दुकानदार आणि रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना, मालगुंड यांच्या वतीने यथोचित स्वागत व सन्मान करण्यात आला.


