(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. धरम केशव निषाद (वय २२, मूळ रा. तालुका किसनपूर, जिल्हा फतेहपूर, उत्तर प्रदेश; सध्या रा. बोईसर, जिल्हा पालघर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील त्याचा सहभाग आणि संबंधित बाबींच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९७/२०२२ आणि १९९/२०२२ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ४५४, ४५७ आणि ३८० अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये धरम निषाद हा पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी होता. गेल्या चार वर्षांपासून तो या गुन्ह्यांच्या अनुषंगाने फरार होता. अखेर ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटक केली.
ही कारवाई रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आरक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर साळवी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बंडबे आणि पोलीस कॉन्स्टेबल बाळू गीते यांनी ही कारवाई केली.
दोन्ही गुन्ह्यांतील फरार आरोपीला अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले असून, या प्रकरणांचा पुढील तपास आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.


