(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरालगत मिरजोळे औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. या कारवाईत नेपाळी महिलेसह दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, प्लॉट मालक सुनीलकुमार गणपत प्रभू (वय ६०) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी पोलिसांनी ई-६९ या प्लॉटवर छापा टाकला. गेल्या चार महिन्यांपासून संशयित नेपाळी महिला या ठिकाणी वास्तव्यास होती. तिच्यामार्फत पुण्यातील दोन महिलांच्या मदतीने देहविक्रीचा व्यवसाय चालविला जात असल्याचे उघड झाले. कारवाईत पोलिसांनी या दोन महिलांची सुटका केली. संशयित नेपाळी महिलेविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी तिला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, या प्लॉटचा मालक सुनीलकुमार प्रभू यांना शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. पोलिस तपासानुसार हा प्लॉट सन १९९१ मध्ये औद्योगिक वापरासाठी एमआयडीसीकडून प्रदान करण्यात आला होता. मात्र, येथे अवैध व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाल्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांकडून सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्लॉट मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. या कारवाईमुळे शहर परिसरात खळबळ उडाली असून, एमआयडीसीतील जागांचा अवैध वापर रोखण्यासाठी प्रशासन आता अधिक कठोर पावले उचलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

